yuva MAharashtra अलर्ट.. सूचना. आणि आदेश.. मराठा समाजाला खूश करण्यासाठी भाजपचं ब्रह्मास्त्र, काय ठरला प्लॅन ?

अलर्ट.. सूचना. आणि आदेश.. मराठा समाजाला खूश करण्यासाठी भाजपचं ब्रह्मास्त्र, काय ठरला प्लॅन ?



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १५ जून २०२४
भाजपने मराठा आमदारांसोबत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक घेतली. मराठा समाजाच्या नाराजीचा फटका विधानसभा निवडणुकीत बसू नये यासाठी ही बैठक घेतली आहे. दादरमधल्या वसंतस्मृतीच्या भाजप कार्यालयातील बैठकांमध्ये विचारमंथन केल्यानंतर नरीमन पॉईंटमधल्या भाजप प्रदेश कार्यालयात मराठा आमदारांची बैठक पार पडली. मराठा समाजाच्या नाराजीचा भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांना मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात फटका बसला होता. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आमदारांमधील अस्वस्थता कमी करत विश्वास देण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न असणार आहे.

भाजप पक्षनेतृत्वाकडून आमदारांच्या कामाचं विश्लेषण होणार आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा मतं कमी मिळवून दिलेल्या आमदारांच्या कामाची झाडाझडती देखील होणार आहे. भाजपनं मराठा समाजासाठी केलेलं काम समाजापर्यंत पोचवण्यात मराठा आमदार अयशस्वी ठरल्याचा दावा केला जातोय. देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेलं आरक्षण मराठा समाजासाठी सारथी, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला दिलेला निधी या सगळ्या गोष्टी पोचवण्यात मराठा आमदार मागे राहीले. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आपल्याला फटका बसू नये यासाठी मराठा आमदारांच्या बचावात्मक पवित्र्याचा भाजपला फटका बसल्याचं मत बैठकीत मांडण्यात आलं. त्यामुळे याच मराठा आमदारांची आज झाडाझडती झाली. भाजप सरकारनं समाजासाठी केलेलं काम समाजापर्यंत पोचवण्यासाठी मराठा आमदारांची भाजपने चांगलीच शाळा घेतल्याची देखील माहिती मिळत आहे.


भाजपच्या मिटिंगमध्ये काय घडलं?

भाजपच्या दादर येथील बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. केंद्रीय मंत्री आणि नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीला केंद्रीय मंत्री पियूष गोयल, रक्षा खडसे, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, अशोक चव्हाण, छत्रपती उदयनराजे, सर्व खासदार आणि नेते उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना काही सूचना दिल्या.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?

“विश्लेषण नुसते करून चालत नाही, रणनीती सुद्धा हवी, त्यासाठी प्रामाणिक आत्मपरीक्षण करावे लागते. मुंबईच्या कार्यकर्त्यांनी मनावर घेतले आहे आणि विजयाचा नवीन संकल्प पाहायला मिळाला. आभाळ कोसळलेले नाही. केवळ 2 लाख मते राज्यात कमी पडली. तर मुंबईत तर 2 लाख मते अधिक मिळाली. 130 विधानसभा मतदारसंघात आपली आघाडी आहे. ध्रुवीकरण प्रचंड झाले आणि आपली संख्या कमी झाली. विरोधकांनी संविधान बदलणार हा नरेटिव्ह तयार केला. त्याची तीव्रता पहिल्या तीन टप्प्यात अधिक होती. त्यामुळे 24 पैकी केवळ 4 जागा मिळाल्या. नंतर आपण त्याला प्रतिवाद केला. आणि पुढच्या 24 जागांपैकी 13 जागा मिळाल्या”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“नरेटिव्ह खोडून काढा. काल परवा महाराष्ट्राला कमी निधी असा नरेटिव्ह आला. खरे तर आधी महाराष्ट्राला 5.1% मिळायचा, आता 6.3% मिळतो. त्याच्या वाटपाचे निकष वित्त आयोग ठरविते. वक्फ बोर्डाला 10 कोटी निधी असा नरेटिव्ह, पण प्रत्यक्षात दिले फक्त 2 कोटी दिले. BDD चाळीतील लॉटरी काढली नाही, असा नरेटिव्ह; ती 20 मे रोजीच होती. पण मतदान असल्याने पुढे ढकलली गेली. ती होणारच आहे. स्मार्ट मीटर लावणार असा नरेटिव्ह; प्रत्यक्षात असा निर्णय नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मेरिटमध्ये येणारे थोडे मार्क कमी मिळाले ते चेहरे पाडतात आणि जे नापास होतात ते 2 मार्क अधिक मिळाले म्हणून हत्तीवरून साखर वाटतात. मनात किंतु-परंतु ठेवू नका. आपल्यात क्षमता आहे. आताची मत कायम ठेवून 1 टक्का मत वाढविली, तर विधानसभा आपण क्लीन स्वीप करू. आता कामाला लागा, असा आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिला.