सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ जून २०२४
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेत करण्यात आलेल्या सजावटीची बिले अद्याप अदा केली नसल्याने मराठा क्रांती मोर्चा व शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्यावतीन महापालिकेसमोर अधिकाऱ्यांच्या विरोधात शंखध्वनी आंदोलन केले. तर मनपातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर धरणे धरले, आयुक्तांनी तातडीने आंदोलनाची दखल घेत आठ दिवसांमध्ये बिले अदा करण्याची ग्वाही दिली.
राज्यात दि. १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महापालिकेत देखील मोठ्या थाटामाटात जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई व इतर सजावट करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या खर्चाची जबाबदारी महापालिकेने घेतलेली होती, परंतु कार्यक्रमासाठी ज्या-ज्या एजन्सीने काम केलेले आहे, त्यांचे पैसे चार महिने झाले तरी अद्याप अदा केलेली नाही. एजन्सीधारकांनी सतत पाठपुरावा केला तरी याकडे दुर्लक्ष करण्यात आले येत आहे.
त्यामुळे संतप्त मराठा क्रांती मोर्चा व शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर बसून, बिले अदा करण्याची मागणी केली. तर आर्थिक तडजोडीची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात महापालिकेसमोर शंखध्वनी केला. आयुक्तांनी या आंदोलनाची दखल घेत आंदोलकांशी चर्चा केली. बिले अदा करण्याबाबत संबंधित पूर्तता करून आठ दिवसांमध्ये पैसे अदा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात सतीश साखळकर, डॉ. संजय पाटील, नितीन चव्हाण, शरद देशमुख, राहुल पाटील, संभाजी पोळ आदी सहभागी झाले होते.