yuva MAharashtra संघ शिक्षा वर्गाचे स्वरूप टप्प्या-टप्प्याने बदलणार !

संघ शिक्षा वर्गाचे स्वरूप टप्प्या-टप्प्याने बदलणार !



| सांगली समाचार वृत्त |
नागपूर - दि. २ जून २०२४
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यवस्थेत कार्यकर्त्यांच्या जडण-घडणीत संघ शिक्षा वर्गाचे मोठे योगदान असते. कालौघातील बदल स्वीकारत संघाने संघ शिक्षा वर्गात यावर्षीपासून बदल सुरू केले आहेत. कालावधी, अभ्यासक्रम आणि इतर गोष्टींमध्ये हे बदल टप्प्या-टप्प्याने होणार असून 2027 पासून हा अभ्यासक्रम पूर्णपणे बदललेला असेल अशी माहिती संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिली. 

यासंदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की, यावर्षीपासून संघ शिक्षा वर्गाचे स्वरूप आणि अभ्यासक्रमात बदल करण्यात आलाय. पूर्वी प्रथमिक संघ शिक्षा वर्ग 7 दिवसांचा असायचा.प्रथम आणि द्वितीय वर्ष 20 दिवस तर तृतीय वर्ष 25 दिवसांचा होता. आता नवीन संरचनेत संघाची ओळख करून देणारा 3 दिवसांचा प्रारंभिक दीक्षा वर्ग असेल. त्यानंतर 7 दिवसांचा प्राथमिक, 15 दिवसांचा संघ शिक्ष वर्ग असेल. त्यानंतर 20 दिवसांचा कार्यकर्ता विकास वर्ग-1 आणि 25 दिवसांचा कार्यकर्ता विकास वर्ग-2 अशी या वर्गांची नावे आणि स्वरूप राहणार आहेत. नवीन प्रणालीमध्ये विशेषत: व्यावहारिक शिक्षणाचा (व्यावहारिक प्रशिक्षण) समावेश असेल असे त्यांनी सांगितले. हे बदल करताना विद्यापीठात ज्या पद्धतीने जुने आणि नवे अभ्यासक्रम यांचा मेळ साधत बदल केले जातात तसेच संघ शिक्षा वर्गाच्या स्वरूपात आणि अभ्यासक्रमात बदल केले जातील असे संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


संघ रचनाचे देशभरात 45 प्रांत असून त्यानंतर विभाग, जिल्हे आणि त्यानंतर खांड आहेत. देशातील 922 जिल्ह्यांमध्ये संघाच्या 73 हजार 117 दैनिक शाखा, 6597 खंड आणि 27 हजार 720 मंडळे आहेत, प्रत्येक मंडळात 12 ते 15 गावे आहेत. शाखांच्या संख्येत वर्षभरात 4 हजार 466 ची वाढ झाली आहे. या शाखांमध्ये 60 टक्के विद्यार्थी आणि 40 टक्के कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यापैकी चाळीशीहून अधिक वयोगटातील स्वयंसेवकांच्या शाखांची संख्या 11 टक्के आहे. तर 27 हजार 717 सप्तहिक मिलन झाले असून त्यात मागील वर्षीच्या तुलनेत 840 ने वाढ झाली आहे. संघ मंडळांची सध्याची संख्या 10 हजार 567 आहे. यासोबतच गावे व शहरांतील 10 हजार वस्त्यांमध्ये 43 हजार शाखा आहेत. यातून विविध वर्गांमध्ये स्वयंसेवकांना संघाची ओळख, कार्याचे स्वरूप, कार्यपद्धती आणि त्यात स्वयंसेवकांची भूमिका आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी नवनवीन गोष्टींचा समावेश करून प्रशिक्षीत केले जाणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होत असतानाच संघाच्या स्वयंसेवकांची नवी पिढी नवे बदल स्वीकारत आपल्या कार्यपद्धतीत परिवर्तन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.