सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २६ जून २०२४
2019 च्या एका मानहाणीच्या प्रकरणात सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधीना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर मोदी सरकारने राजकीय डाव साधत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली होती. या निकालाच्या अवघ्या 24 तासात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तत्परता दाखवत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. लोकसभा अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांनी ज्या राहुल गांधींची खासदारकी रद्द केली आज तेच राहुल गांधी बिर्ला यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांना अध्यक्षपदाच्या खुर्ची पर्यंत घेऊन गेले.
राहुल गांधी रायबरेली व वायनाड या दोन मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यांनी जिंकून आले असून आता त्यांची लोकसभेत विरोधी पक्ष नेते पदी निवड झाली आहे. बुधवारी लोकसभेत अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. यात जास्त मतं मिळवून ओम बिर्ला यांची अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्ष नेते या नात्याने राहुल गांधी व केंद्रीय संसदीय मंत्री किरेन रिजिजू यांनी ओम बिर्ला यांना त्यांच्या खुर्चीवर विराजमान केले.
राहुल गांधी यांनी 2019 मध्ये कर्नाटकात बोलताना 'सर्व चोरांचे आडनाव मोदी का?' असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याविरोधात गुजरातमधील भाजपचे आमदार पुर्णिश मोदी यांनी सुरत सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. गेल्या वर्षी मार्च महिन्यात न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवताना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. सोबतच न्यायालयाने राहुल गांधींना तत्काळ जामीन मंजूर करताना शिक्षेला 30 दिवसांची स्थगिती दिली होती. तरीही ओम बिर्ला यांनी तत्काळ कारवाई करत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केलेली.