yuva MAharashtra स्वामी विवेकानंद स्मारक शिलेवर अनुभवले नवचैतन्य आणि ऊर्जा; भारताच्या पुनरुत्थानाचा पंतप्रधान मोदींचा संदेश !

स्वामी विवेकानंद स्मारक शिलेवर अनुभवले नवचैतन्य आणि ऊर्जा; भारताच्या पुनरुत्थानाचा पंतप्रधान मोदींचा संदेश !



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २ जून २०२४
लोकसभेच्या निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कन्याकुमारी येथे जाऊन स्वामी विवेकानंद स्मारक शिलेवर तब्बल 45 तासांची ध्यानधारणा केली. या ध्यानधारणेनंतर पंतप्रधान मोदी पुन्हा आपल्या कामावर परतले.  आज सायंकाळी मतदानाचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर होताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वामी विवेकानंद शिला स्मारकावर आलेली आपली अनुभूती समस्त भारतीयांशी शेअर केली.

भारतीयांसाठी मोदींनी दिला संदेश 

भारताच्या दक्षिण टोकावरील कन्याकुमारीच्या स्वामी विवेकानंद शिला स्मारकावर मला नेहमीच एक दैवी ऊर्जा जाणवते. ती यावेळीही जाणवली. याच शिलेवर माता पार्वती आणि त्यानंतर स्वतः स्वामी विवेकानंदांनी ध्यानधारणा केली होती. पुढे एकनाथजी रानडे यांनी या शिलेचे स्वामी विवेकानंद शिला स्मारकात रूपांतर केले. त्यामुळे स्वामीजींचे विचार समस्त भारतीयांसमोर पुन्हा एकदा जिवंत झाले.


भारताच्या आध्यात्मिक पुनरुत्थानाचे अध्वर्यू स्वामी विवेकानंद माझे जीवन आदर्श आहेत. माझी ऊर्जा आणि अध्यात्म धारणेचे प्रेरणास्त्रोत आहेत. अनेक वर्षांपूर्वी समस्त भारत वर्षाचा प्रवास केल्यानंतर स्वामी विवेकानंदांनी याच शिलेवर येऊन ध्यानधारणा केली. त्यावेळी त्यांना भारताचे पुनरुत्थान दिसले.

हे माझे भाग्य आहे की स्वामी विवेकानंदांच्या विचारांना आणि आदर्शांना मूर्त रूप दिल्यानंतर मला या पवित्र ठिकाणी ध्यानधारणेची संधी मिळाली. स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणेच्या साक्षीने माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आणि प्रत्येक कण या देशासाठी समर्पित करतो. देशाच्या प्रगतीसाठी आणि समस्त भारतीयांच्या कल्याणासाठी मी भारत मातेला इथून वंदन करतो !