सांगली समाचार वृत्त |
दि. २८ जून २०२४
एकदा अध्यात्मातील हे खूप मोठं ऋषि अचलपूर राज्यात आले. हां हां म्हणता, ही बातमी संपूर्ण राज्यात वाऱ्यासारखी पसरली. राज्यातील जनता आपले दुःख घेऊन ते हरण करण्यासाठी या ऋषीच्या झोपडी बाहेर रांग लावून उभी असायची. सदर ऋषी या लोकांना दुःख दूर कसे करावे याबाबत मार्गदर्शन करायचे. अर्थात स्वतः दुःख दूर करण्याऐवजी त्यासंबंधी त्याला केवळ मार्ग दाखवायचे. या व्यक्ती खुश होऊन ऋषीच्या झोपडी बाहेर पडायचे, तेव्हा त्याला याबाबतचा मार्ग सापडलेला असायचा.
या ऋषीची ख्याती अचलपूरच्या राजाच्या कानावर गेली. त्याने आपल्या सैनिकाला सदर ऋषींना आपल्या महालात आदरपूर्वक घेऊन येण्याचे आदेश दिले. सैनिक ऋषीपर्यंत पोहोचले व त्यांनी राजाचे आदेश त्यांच्या कानावर घातले.
तेव्हा त्या ऋषिंनी नम्रपूर्वक सांगितले. "मला राजमहाल वर्ष आहे. राजाला मला भेटायची इच्छा असेल तर त्याने इथपर्यंत यावं."
सैनिकांनी ऋषींचा निरोप जसाचा तसा राजाला सांगितला. राजाला राग आला. तो तात्काळ ऋषींच्या झोपडीजवळ पोहोचला. तेथे राजा आला आहे हे पाहून झोपडी बाहेर उभे असलेले नागरिक बाजूला झाले. राजा तडक झोपडीतील ऋषी जवळ पोहोचला आणि त्याने याबाबत जाब विचारला.
ऋषींनी अत्यंत नम्र पूर्वक राजाला म्हटले,
"महोदय तुम्ही एकटे या !"
तेव्हा राजाने मागे पाहिले, त्याचे सैनिक त्याच्या पाठीमागे उभे होते. राजाला वाटले ऋषींना या सैनिका सोबत आलेले आवडले नसावे. त्याने नजरेनेच सैनिकांना बाहेर जाण्याचा इशारा केला. सैनिक बाहेर गेल्यानंतर त्याने पुन्हा ऋषींना विचारले,
"आपण राजवाड्यात का आला नाहीत ?"
तेव्हा पुन्हा ऋषींनी बाकी काही न बोलता म्हटले,
"महोदय तुम्ही एकटे या !"
राजाला काही बोध झाला नाही त्याने प्रश्नार्थक नजरेने ऋषींकडे पाहिले. ऋषींनी शांतपणे राजाला म्हटले,
" महोदय, आपण आपल्या सोबत जे 'राजेपण' घेऊन आला आहात, ते बाहेर ठेवून या !"
राजा उठला, बाहेर आला. आणि त्याने आपली तलवार व जिरे टोप बाहेरून सैनिकांजवळ दिले व तो पुन्हा ऋषींच्या जवळ आला. आणि त्याने कृषींना विचारले...
" आता बोला !"
तेव्हा ऋषींनी त्याच सौम्य भाषेत म्हटले.
" महोदय अजूनही तुम्ही एकटे नाही आहात, एकटे या !"
राजाला काहीच समजले नाही त्यांनी पुन्हा ऋषिजींच्याकडे पाहिले. तेव्हा त्यांनी म्हटले,
" महोदय, अजूनही तुमचे राजेपण तुमच्या मनात आहे ते बाहेर ठेवून या !"
राजाला आपली चूक उमगली. आणि तो झोपडी बाहेर असलेल्या लोकांच्या रांगेत सर्वात शेवटी जाऊन उभारला. जेव्हा त्याचा नंबर आला तेव्हा तो ऋषिजींच्या समोर आला आणि त्याने ऋषींना नमस्कार केला. तेव्हा ऋषीजींनी म्हटले.
" महोदय, आता तुम्हाला माझ्या मार्गदर्शनाची गरज नाही. जोपर्यंत तुम्ही राज्याचे 'राजे' म्हणून राज्यकारभार करीत होता, तोपर्यंत तुमच्या मनात एक प्रकारचा अहगंड होता. तुम्ही 'सेवक' म्हणून राज्य कारभार करून पहा. फरक तुमचा तुम्हाला लक्षात येईल !"
या घटनेनंतर केवळ त्याच्या राज्यातच नव्हे, तर कीर्ति संपूर्ण त्रिखंडात पसरली आणि तो एक आदर्श राजा म्हणून प्रसिद्ध पावला.
मित्रांनो, आपण अभिमानाचे गाठोडे बाहेर ठेवून मगच परमेश्वराकडे जावे; तसेच सद्गुरूच्या घरीही आपले भांडवल बाजूला ठेवूनच जावे. ‘मी कोण’ याची जाणीव जोपर्यंत राहते, तोपर्यंत दुजेपण आलेच. अभिमान वाढविण्याकरिता देवाकडे नका जाऊ. दुसऱ्याचे वाईट व्हावे असे आपल्याला वाटले की आपला अभिमान वाढीला लागला आहे असे जाणावे. पोरांबाळांवर जितके प्रेम करता तितके प्रेम भगवंतावर करावे. आपली आणि भगवंताची इच्छा एकच होणे, हे परमार्थाचे सूत्र आहे. भगवंताची जी इच्छा तीच आपली करावी, आणि आनंदात रहावे. अगदी नि:स्वार्थबुद्धीने केलेले कर्तव्य कधी वाया जात नाही. एखाद्या सावकाराकडे कोणाचे दागिने गहाण असले, तर त्याने आपल्या घरच्या लग्नामध्ये ते वापरणे हा अन्याय आहे. त्याचप्रमाणे, आपली मुलेबाळे ही देवाने आपल्याजवळ दिली आहेत, त्यांचे रक्षण करावे; ते कर्तव्य होईल. पण त्यांच्या ठिकाणी आपलेपणा ठेवून सुखदु:ख भोगणे हे मात्र पाप आहे.
संन्याशाने भगवे वस्त्र धारण केल्यावर त्याचा थोडा तरी परिणाम बुद्धीवर होतोच. त्याचप्रमाणे आपण भजनपूजन करू लागल्यावर त्याचा परिणाम आपल्यावर दिसला पाहिजे. जो शहाणा असेल त्याने समजून, आणि जो अडाणी असेल त्याने श्रद्धेने, बंधने पाळावीत. स्वत:च्या मताबद्दल आपल्याला पूर्ण खात्री असावी, त्यात घोटाळा असू नये. मनाने आपण खंबीर झाले पाहिजे. ज्याप्रमाणे पांढरा कपडा मळण्याचा जास्त संभव असतो, त्याप्रमाणे सत्कर्माला विघ्ने फार येतात; त्यांना न जुमानता आपण सत्कर्म करावे. आचार आणि विचार ही दोन्ही जुळली म्हणजे उच्चारही तसाच येतो.
नारळात पाणी जितके गोड तेवढी खोबऱ्याला चव कमी; तसे, जेवढी विद्वत्ता जास्त तेवढी निष्ठा शंकास्पद. फार वाचू नका; जे काही थोडे वाचाल त्याचे मनन करा; आणि ते कृतीत आणा. जसे वडिलांचे पत्र वाचल्यावर आपण त्यातल्या मजकुराप्रमाणे कृती करतो, तशी ग्रंथवाचनाच्या समाप्तीनंतर कृतीला सुरुवात करावी. परमार्थ हे सर्वस्वी कृतीचेच शास्त्र आहे. समाधान आणि आनंद हे त्या शास्त्राचे साध्य आहे. भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केले की जीवनात आनंद उत्पन्न होतो.
सर्व काही करावे । पण खरे प्रेम साधनावर असावे ॥