yuva MAharashtra बहुजन समाजातील असंख्य कुटुंबांचा विकासाचा महामार्ग लठ्ठे एज्युकेशन सोसायटीतून जातो..!

बहुजन समाजातील असंख्य कुटुंबांचा विकासाचा महामार्ग लठ्ठे एज्युकेशन सोसायटीतून जातो..!



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १४ जून २०२४
आज लठ्ठे एज्युकेशन सोसायटी ७३ वर्षाची झाली..!
ही संस्था दि.ब.आण्णासाहेब लठ्ठे यांच्या भरीव कार्याचे चिरंतन स्मारक आहे. १३ जून १९५१ रोजी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचा जन्म झाला. दक्षिण भारत जैन सभेचे कर्तबगार नेते स्व.बाबगोंडा भुजगोंडा पाटील सांगली, स्व. मगनलाल शहा मुंबई, स्व. फड्याप्पा गुंजाळ जज्ज बेळगाव, स्व. श्रीमंतीबाई कळंत्रे अक्का सांगली (लठ्ठे साहेबांच्या मेहुणी) स्व. नाभिराज रुकडे आष्टा, स्व. प्राचार्य जी.के.पाटील सांगली, स्व. जी. बी. दुग्गे वकील सातारा, स्व. बाळा धावते सांगली व स्व. आर. सी. जैन चार्टर्ड अकौटंट पुणे हे लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक नवरत्न मंडळी..!!
       
संस्थेच्या स्थापनेपासून आजतागायत भोज, बेडकीहाळ,चिकोडी, शमनेवाडी, बोरगाव, अक्कोळ, दत्तवाड, जयसिंगपूर, सांगली, नांदगिरी या भागातील अनेक नेते आणि कार्यकर्ते व दानशूरांनी संस्थेला सढळ हाताने मदत केली आहे. सध्याचे शासक, कार्यकारी व विश्वस्त समितीचे पदाधिकारी व सदस्य संस्थेच्या गुणात्मक व संख्यात्मक विकासासाठी अनेक प्रकल्प राबवून संस्थेच्या प्रगतीला चांगला हातभार लावत आहेत. या संस्थेच्या विकासात आजीव सभासद समितीचेही योगदान लक्षवेधी आहे. संस्थेचा स्टाफ झोकून देऊन काम करतो.


पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील बहुजन समाजातील असंख्य कुटुंबांच्या विकासात लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे योगदान नेत्रदीपक आहे. मराठी, कन्नड व इंग्रजी माध्यमाच्या बालवाड्या, प्राथमिक, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, वरीष्ठ महाविद्यालये, लाॅ काॅलेज, अध्यापक विद्यालय, रात्र महाविद्यालय, तंत्र निकेतन, आय. टी. आय. कन्या शाळा व महाविद्यालय, लेडीज होस्टेल्स व प्रिंटींग प्रेस असा त्रेचाळीस शाखांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी आणि शेकडो सेवक असा विस्तार असलेली ही संस्था संख्यात्मक आणि गुणात्मक विकासात अग्रेसर आहे. या संस्थेच्या माध्यमातून असंख्य डॉक्टर, इंजिनिअर,वकील, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, व्यापारी व उद्योजक, शासकीय अधिकारी, शेतकरी, सैनिक व लष्करी अधिकारी, पत्रकार, लोकप्रतिनिधी व कलाकार घडले आहेत.

महाराष्ट्र व कर्नाटकातील शैक्षणिक सुधारणांचा इतिहास हा लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक योगदानाची नोंद घेतल्याशिवाय पुढे सरकू शकत नाही. स्व. दि.ब.आण्णासाहेब आण्णासाहेब लठ्ठे यांच्या कार्याचे जिवंत व भरीव स्मारक  असलेल्या या संस्थेच्या शासक समितीचे विद्यमान अध्यक्ष मा. राजीव देवगोंडा पाटील, कार्यकारी समितीचे चेअरमन मा. शांतीनाथ गुंडाप्पा कांते, व्हा. चेअरमन मा. चंद्रकांत भाऊसाहेब पाटील, मानद सचिव मा. सुहास बापूसाहेब पाटील, खजिनदार मा. भालचंद्र विरेंद्र पाटील, विश्वस्त समितीचे चेअरमन मा. प्रमोद बाळासाहेब चौगुले व सेक्रेटरी मा. गजकुमार आण्णाप्पा माणगावे यांचे टीम वर्क गुणात्मक व संख्यात्मक विकासासाठी व नवनवीन आव्हानांना समर्थपणे तोंड देण्यासाठी सहाय्यभूत ठरत आहे.
लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या कामात सेवाभावी वृत्तीने योगदान दिलेल्या सर्व माजी पदाधिकारी व सदस्यांची सन्मानाने  आठवण करुन कृतज्ञता व्यक्त करु या. संस्था अधिकाधिक मोठी व्हावी अशी सद्भावना व्यक्त करताना या संस्थेत आठ वर्षे मानद अधीक्षक, २६ वर्षे आजीव सभासद, ३३ वर्षे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक.. कांही काळ पर्यवेक्षक व उपप्राचार्य म्हणून काम करण्याचे सद्भाग्य आम्हाला लाभले ही आमच्या जीवनातील अविस्मरणीय बाब आहे अशी कबूली देताना आम्हाला आनंद होतो. 

माणसांचं वय वाढलं तर ते वृध्द होतात परंतु संस्था वाढत्या वयाबरोबर अधिक तरुण  आणि मजबूत होतात. लठ्ठे एज्युकेशन सोसायटी ही अधिक मजबूत होताना तिचा संख्यात्मक व गुणात्मक विस्तार आणखी वाढत राहो हीच वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा 

प्रा. एन.डी.बिरनाळे
माजी मानद अधीक्षक
लठ्ठे एज्युकेशन सोसायटी
दि. १३ जून, २०२४