| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १ जून २०२४
४ जूननंतर जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी केला आहे. तसेच पक्षाच्या वर्धापनदिनी शरद पवार गटातील अनेक नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
सूरज चव्हाण म्हणाले की, "१० जून रोजी पक्षाच्या वर्धापनदिनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार, प्रांताध्यक्ष सुनिल तटकरे आणि इतर सर्व जेष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत शरदचंद्र पवार गटातील अनेक नेत्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. अजितदादांवर विश्वास ठेवून अनेक जेष्ठ नेतेदेखील पक्षात येणार आहे."
"तसेच ४ जूनच्या निकालानंतर जयंत पाटीलसुद्धा काँग्रेसमध्ये जातील. त्यांनी काँग्रेस नेते राहूल गांधी आणि सोनिया गांधींची वेळ मागितली आहे. त्यांचा मुहूर्त ठरलेला आहे. त्यामुळे ४ जूननंतर शरदचंद्र पवार गट रिकामा होईल आणि तिकडचे अनेक लोक अजितदादांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश करतील," असा दावा त्यांनी केला आहे.