Sangli Samachar

The Janshakti News

'आमचंच खरं' हा निर्णय महाआघाडीसाठी ठरणार आत्मघातकी ! पवार ठाकरे यांच्यातही वादाची ठिणगी ?


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २३ जून २०२४
लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत काँग्रेस मोठा भाऊ ठरला आहे. विधानसभेला काँग्रेस पक्ष सर्वाधिक जागावर ठाम आहे. मात्र 'आमचंच खरं' असा पवित्रा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. तिन्ही पक्षांच्या या निर्णयामुळे महाआघाडीतील इतर पक्षांनी 'वेट अँड वॉच' अशी भूमिका घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत नेते आप आपल्या भूमिकेवर ठाम राहिले, तर 'महाआघाडीत बिघाडी' होणार असल्याने, इतर पक्ष काय भूमिका घेतात यावर महाआघाडीचे भवितव्य ठरणार आहे.

नुकत्याच पुणे येथे झालेल्या नवनिर्वाचित खासदार आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात 'शिवस्वराज्य यात्रा' काढण्याचा निर्णय या बैठकीत झाला. याची संपूर्ण जबाबदारी खा. अमोल कोल्हे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तर खा. सुप्रिया सुळे यांना राज्यभरात महिला अधिवेशन घेऊन महिला संघटन मजबूत करण्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अनिल देशमुख यांच्याकडे विदर्भाची तर राजेश टोपे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात स्वतः शरद पवार पक्षाची ताकद वाढवण्याकडे लक्ष देणार आहेत.

काँग्रेस पक्षाने राज्यातील सर्व जिल्ह्यात 'तयार राहण्याचे' आदेश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्याने काँग्रेस पक्ष 'एकला चलो रे' ही भूमिका घेणार की काय अशी चर्चा रंगली आहे. पटोले यांनी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना मतदार संघात आपली ताकद वाढविण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादी व ठाकरे शिवसेना जागावर हटून बसली तर स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यासाठी काँग्रेस पक्ष कामाला लागला असल्याची माहिती काँग्रेस सूत्रांनी दिली आहे.


उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच महाराष्ट्रातील आपल्या सर्व जिल्हाप्रमुखांना मतदार संघाचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जर मनाप्रमाणे जागा मिळाल्या नाहीत, तर ठाकरे शिवसेनाही वेगळी वाट पकडण्याच्या तयारीत आहे, असा संदेश राज्यभर पोहोचला आहे. परंतु ठाकरे शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी सबुरीने घेण्याचे ठरवलेले दिसते. खा. राऊत आणि मा. शरद पवार यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना राऊत म्हणाले की, आत्तापर्यंत जागा वाटपावर कोणतीही चर्चा झालेली नाही. शरद पवार यांच्या भूमिकेबाबत बोलताना ते म्हणाले की पवार साहेब हे आमच्या युतीचे भक्कम आधारस्तंभ आहेत. ते कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाहीत. सर्वांना समान अधिकार आहेत प्रत्येक जण समान भागधारक आहे. महाराष्ट्रात आम्ही मोदीला बहुमत मिळवण्यापासून रोखले आहे, देशात आमची ताकद दाखवून दिली आहे. विधानसभेच्या 288 जागा आहेत, त्यामुळे प्रत्येकाला आपापला हिस्सा मिळू शकतो काळजी करण्याची गरज नाही. लोकसभा निवडणुकीत पवार साहेबांचा स्ट्राइक रेट सर्वाधिक आहे यात शंका नाही. परंतु या निवडणुकीत आम्हीही मेहनत घेतली आहे. दिल्लीतील काँग्रेसच्या बैठकीमुळे महाआघाडीचे बैठक पुढे ढकलण्यात आले आहे. लोकसभेच्या आगामी अधिवेशनानंतरच ही बैठक होणार असून, या बैठकीतच सविस्तर चर्चा होईल. तोपर्यंत 'जर तर' च्या शक्यतांना व वावड्यांना कोणताही आधार नाही. 

या साऱ्या पार्श्वभूमीवर महाआघाडीचे भवितव्य काय असेल हे आगामी लोकसभा अधिवेशनाच्या बैठकीनंतरच ठरणार असल्याचे राऊत यांच्या बोलण्यावरून वाटते. परंतु या बैठकीत जागा वाटपावरून एकमत झाले नाही, तर काय ? याचे उत्तर ना पटोलेंनी दिले आहे, ना पवार साहेबांनी दिले आहे, ना ठाकरे यांनी. त्यामुळे राऊत यांच्या मानण्याप्रमाणे या 'जरतर'च्या गोष्टी म्हणाव्या लागतील.