yuva MAharashtra मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण !

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण !



| सांगली समाचार वृत्त |
लखनऊ - दि. ९ जून २०२४
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला उत्तर प्रदेशात सगळ्यांत मोठा झटका बसला. तेथील पराभवाबाबत लखनौपासून नवी दिल्लीपर्यंत भाजपचे मंथन सुरू आहे. त्याचीच चर्चा करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. बैठक तब्बल १ तासापेक्षा जास्त वेळ सुरू होती. मात्र त्यातील सगळ्यांत महत्वाची गोष्ट ही की योगी मंत्रिमंडळातील दोन्ही उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि केशव प्रसाद मौर्य या बैठकीला अनुपस्थित होते. त्यावरच आता चर्चा सुरू झाली असून प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.

भारतीय जनता पार्टीच्या सहयोगी पक्षांचे नेते आशीष पटेल, ओमप्रकाश राजभर, संजय निषाद आणि अनिल कुमार उपस्थित होते. मंत्री असलेले आणि आता खासदार म्हणून निवडून आलेले अनूप वाल्मिकी आणि जितीन प्रसादही हजर होते. मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर होते. या दोघा नेत्यांनी काल दिल्लीतील कार्यक्रमाला हजेरी लावली होती. दरम्यान, पाठक आज ऋषिकेश येथे जाणार होते त्यामुळे येऊ शकले नाहीत असे कारण सांगण्यात आले.


निवडणूक समाप्त झाल्यानंतर योगींनी अधिकाऱ्यांचीही बैठक घेतली आणि थांबलेली कामे आणि योजना वेळेवर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही अशी ताकीदही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. तसेच रिक्त पदांवरील भरतीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशात ७५ जागा लढवल्या होत्या. यातील ७२ जागांवर पक्षाची मतांची टक्केवारी कमी झाली असल्याची माहिती समोर आली आहे. केवळ गौतम बुध्द नगर, कौशंबी आणि बरेली या तीन जागांवर पक्षाला गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. या ७५ जागांपैकी १२ जागा अशा आहेत की जेथे भाजपची मते लाखापेक्षा कमी झाली आहेत. मथुरा, अलिगढ, मुझफ्फरनगर, फतेहपूर आणि गोरखपूर मतदार संघांचा त्यात समावेश होतो. तर ३६ जागा अशा आहेत की जेथे मतांचे प्रमाण ५० हजार ते १ लाखाच्या दरम्यान कमी झाले आहे.