Sangli Samachar

The Janshakti News

लाल परी मालामाल ! सवलतींमुळे दोन वर्षांत कमवले ३८९४ कोटी ८८ लाख !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २० जून २०२४
राज्यभरातील प्रवाशांना गावागावापर्यंत पोहचविण्यासाठी एसटी मोठा हातभार लावत असून, प्रवाशांची संख्या वाढावी म्हणून विविध योजनाही लागू करत आहे. त्यानुसार, आतापर्यंत लागू करण्यात आलेल्या विविध योजनांद्वारे एसटीचे प्रवासी वाढत असून, ज्येष्ठांसह महिलांच्या योजनांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा महामंडळाने करत महिला सन्मान योजना सुरू झाल्या पासून ३१ मे अखेर ७२ कोटी ७६ लाख ११ हजार ५७६ लाभार्थींनी ५० टक्के सवलतीच्या दरामध्ये प्रवास केल्याचे सांगितले.

एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, ७५ वर्षावरील जेष्ठांना एसटीमधून मोफत प्रवास आणि राज्यातील सर्व महिलांना एसटीच्या तिकीट दरात ५० टक्के या सवलतीमुळे एसटीला प्रतिपूर्ती रक्कम म्हणून गेल्या दोन वर्षांमध्ये ३८९३ कोटी ८८ लाख ४१ हजार रुपये उत्पन्न मिळाले. सवलतीच्या प्रतिपूर्ती रक्कमेमुळेच एसटीची आर्थिक गाडी रुळावर आली. मे महिन्यात एसटीला १६ कोटी तोटा झाला असून योजनांमुळे एसटीची घोडदौड आर्थिक फायद्याच्या दिशेने सुरू होईल, असा विश्वास महामंडळाने व्यक्त केला आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ वर्षावरील ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाची सवलत देण्यात आली. २६ ऑगस्ट २०२३ पासून अमृत ज्येष्ठ नागरिक या नावाने ही योजना एसटीने सुरू केली. योजना सुरू झाल्यापासून ३१ मे २०२४ पर्यंत योजनेअंतर्गत ३४ कोटी ९९ लाख २१ हजार ३०२ लाभार्थींनी मोफत प्रवास केला. त्याची प्रतिपूर्ती रक्कम म्हणून शासनाने एसटीला १७९९ कोटी ३६ लाख ७० हजार रुपये दिले. सध्या दरमहा सुमारे २ कोटी २५ लाख लाभार्थी योजनेचा लाभ घेत असून प्रतिपूर्ती रक्कम म्हणून एसटीच्या महसूलात महिन्याला सुमारे १२५ कोटी रुपये जमा होतात.


२०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये शासनाने राज्यातील सर्व महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून प्रवास करताना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची जाहीर केले. योजना १७ मार्च २०२३ पासून एसटीने महिला सन्मान योजना या नावाने सुरू केली. ही योजना सुरू झाल्यापासून ३१ मे २०२४ अखेर या योजनेअंतर्गत ७२ कोटी ७६ लाख ११ हजार ५७६ लाभार्थींनी ५० टक्के सवलतीच्या दरामध्ये प्रवास केला. याची प्रतिकृती रक्कम म्हणून शासनाने एसटीला २०९४ कोटी ५१ लाख ७० हजार रुपये दिले आहेत. सध्या महिन्याला सरासरी ५ कोटी ७५ लाख महिला योजनेच्या माध्यमातून ५० टक्के तिकीट दरात एसटीतून प्रवास करत आहेत. याची प्रतिपूर्ती रक्कम म्हणून शासन महिन्याला सरासरी १८० कोटी रुपये एसटीला देत आहे.

अमृत ज्येष्ठ नागरिक योजना
महिना / लाभार्थी
एप्रिल २०२४ / २२७२५३०६
एप्रिला २०२३ / १५६६४१३०
मे २०२४ / २३६६७२९४
मे २०२३ / १७५७२८०८

महिला सन्मान योजना
महिना / लाभार्थी
एप्रिल २०२४ / ५६४५७२७९
एप्रिल २०२३ / ४६५८२८८५
मे २०२४ / ५८५८५९३२
मे २०२३ / ५८२१८७०९