Sangli Samachar

The Janshakti News

जयंत पाटील यांना घेरण्यासाठी विरोधक एकवटले !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ जून २०२४
इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे गेली ३० वर्षे वर्चस्व आहे. लोकसभा निवडणुकीतील त्यांचा करिश्मा पाहता त्यांची राज्याच्या नेतृत्वाकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना राेखण्यासाठी राज्यस्तरावरील त्यांच्या विराेधकांनी थेट इस्लामपुरात आपापल्या परीने आव्हान देण्याचा प्रयत्न चालविला आहे. जयंत पाटील यांना मतदारसंघातच राेखण्याचा डाव आखला जात आहे.

इस्लामपूर नगरपालिकेच्या गत निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, 'स्वाभिमानी'चे नेते राजू शेट्टी यांनी जयंत विरोधी गटाला ताकद दिली. त्यामुळेच पालिकेतील राष्ट्रवादीची ३० वर्षांची असलेली सत्ता संपुष्टात आली. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत मात्र विराेधकांचे काही चालले नाही. पुन्हा जयंत पाटील यांनाच जनतेने काैल दिला.


आताही लोकसभा निवडणुकीपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साखर उद्योगाच्या माध्यमातून इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात आपल्या गटाची मजबूत बांधणी चालविली. मात्र, लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. इस्लामपूर मतदारसंघातही याचा परिणाम झाला. माेठ्या उमेदीने अजित पवार यांच्या पाठीशी गेलेले नेते-कार्यकर्ते नाउमेद झाले. बांधणी होण्याअगोदरच पक्षाला घरघर लागली. मात्र, सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागताच राष्ट्रवादीमध्ये पुन्हा ऊर्जा आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या रणांगणानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इस्लामपुरात प्रथमच एन्ट्री करून बाजी मारली. शिंदेसेनेचा गटही मजबूत केला. हुतात्मा गटाला ताकद देण्याचीही शिंदे यांनी खेळी केली आहे. दुसरीकडे प्रहार संघटनेची बांधणी यापूर्वीपासूनच इस्लामपूर मतदारसंघात आहे. लोकसभेच्या निमित्ताने राजू शेट्टी यांचा प्रचार करण्यासाठी इस्लामपूर-शिराळ्यात बच्चू कडू यांनी सभा घेतल्या. याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीनेही येथे अस्तित्व दाखविण्यास सुरुवात केली आहे. जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी राज्यातील विविध पक्षांतील विरोधी नेत्यांनी थेट त्यांच्या बालेकिल्ल्यात शिरकाव केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच इस्लामपूर मतदारसंघात उद्योग क्षेत्राला गती दिली आहे. आगामी सर्वच निवडणुकीमध्ये सक्रिय होण्यासाठी नव्याने पक्ष बांधणी सुरू आहे.