| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १ जून २०२४
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला स्थलांतरीत होत असताना थेट परकीय गुंतवणुकीत गुजरातला मागे टाकत महाराष्ट्र सलग दुसऱ्या वर्षी अवलस्थानी आल्यानं भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या खुशीत, फडणवीसांनी 'बोलायला नाही, कर्तृत्व दाखवायला हिंमत लागते', असा विरोधकांना चिमटा घेतला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटरवर थेट परकीय गुंतवणुकीची आकडेवारी शेअर करत कौतुक करून घेतलं आहे. थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसऱ्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आला आहे. 2022-23 आणि 2023-24, अशी सलग दोन वर्ष महाराष्ट्र अव्वलस्थानी आहे. केंद्र सरकारच्या 'डीपीआयआयटी'ने याबाबत गुरूवारी (ता. 30) आकडेवारी जाहीर केली आहे.
या आकडेवारीनुसार 2023-24 मध्ये 1 लख 25 हजार 101 कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे. हीच गुंतवणूक 2022-23 मध्ये 1 लाख 18 हजार 422 कोटी रुपये होती. या गुंतवणुकीत यावर्षी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या आर्थिक वर्षांतील गुंतवणूक ही गुजरातमध्ये प्राप्त झालेल्या एकूण गुंतवणुकीपेक्षा दुपटीहून अधिक असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील थेट परकीय गुंतवणूक ही दुसऱ्या क्रमांकावरील गुजरात आणि तिसऱ्या क्रमांकावरील कर्नाटकच्या एकूण बेरजेपेक्षाही अधिक आहे, असे सांगून महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र पिछाडला होता, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना घेतला.
दरम्यान, गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला स्थलांतरीत झाले आहे. तसेच पुण्यातील हिंजवडीच्या आयटी पार्कमधील 37 कंपन्यांनी स्थलांतरी केल्याची माहिती समोर आली. यामुळे विरोधकांनी राज्य सरकारवर टीका करण्यात सुरूवात केली आहे. यातच देवेंद्र फडणवीस यांनी थेट परकीय गुंतवणुकीची आकडेवारी जाहीर करून अंगावर येत असलेल्या विरोधकांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे.