yuva MAharashtra आता घरी लागणार नाहीत 'स्मार्ट मीटर', लहान व्यावसायिकांनाही वगळले, सरकारकडून जनआक्रोशाची दखल !

आता घरी लागणार नाहीत 'स्मार्ट मीटर', लहान व्यावसायिकांनाही वगळले, सरकारकडून जनआक्रोशाची दखल !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १५ जून २०२४
मागील काही दिवसांपासून विजेच्या स्मार्ट मीटरविरोधात सुरू असलेल्या जनआक्रोशाची दखल राज्य सरकारने घेतली आहे. घरगुती वापरासाठी स्मार्ट मीटर लागू केले जाणार नाहीत, त्यासाठी पूर्वीचीच पद्धत कायम राहील, असे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी जाहीर केले. 

मुंबईत शुक्रवारी भाजपच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात फडणवीस यांनी सामान्य वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही, असे स्पष्ट केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली. त्यामुळे आता घरगुती आणि लहान व्यावसायिकांसाठी स्मार्ट मीटर न लावता ते केवळ औद्योगिक आणि मोठ्या वीज ग्राहकांसाठी ते लावले जातील, असे स्पष्ट झाले.

- २.१६ कोटी सर्वसामान्य ग्राहकांकडे बसविणार होते स्मार्ट वीज मीटर
- ४ कंपन्यांना दिले होते कंत्राट
- स्मार्ट मीटरचे कंत्राट अदानी पॉवर, जीनस कंपनी, एनसीसी कंपनी, मॉन्टेकार्लो या कंपन्यांना देण्यात आले होते.
- येत्या आठवड्यापासून ते बसविण्यास सुरुवात होणार होती.
- आता मात्र फडणवीस यांच्या घोषणेमुळे सामान्य वीज ग्राहकांकरीता स्मार्ट मीटर आणली जाणार नाहीत, हेही स्पष्ट झाले आहे.


मीटरवरून दावे-प्रतिदावे

लोकसभा निवडणुकीच्या आधीच स्मार्ट मीटरविरोधात नाराजीचे सूर उमटले होते. वीजग्राहक आणि वीज कर्मचाऱ्यांमध्येही त्याबाबत रोष होता. या मीटरमुळे विजेचे बिल अधिक येईल, असा काहींचा दावा होता.

- २५.६ लाख औद्योगिक व मोठ्या ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसविणार.

- स्मार्ट मीटर हे प्रीपेड स्वरुपाचे आहे. त्यामुळे वीज चोरी, चुकीचे मीटर रिडिंग करून अवाजवी बिले दिली जाणे याला आळा बसेल, असे महावितरणचे म्हणणे होते.

- सध्याच्या पद्धतीत वीज कर्मचारी रिडिंग घ्यायचे, वीज बिलांचे वाटप करायचे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर स्मार्टमीटरमुळे गदा येईल, असे कर्मचारी संघटनांचे म्हणणे होते.