Sangli Samachar

The Janshakti News

डॉ. विश्वजीत कदम यांच्या वाढत्या 'वडाला' बोन्साय करण्यासाठी 'कटकारस्थानाच्या कैच्या' सरसावल्या' !


सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ जून २०२४
दोन-तीन वेळा नगरसेवक, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य झालं की आमदारकीची स्वप्ने पडणे, आमदार झाले की मंत्रीपदाचे स्वप्न पडणे आणि मंत्री झालं की मुख्य मंत्री पदाची स्वप्ने पडणे हा मानवी स्वभाव आहे, त्यात काही गैर नाही.... परंतु बऱ्याच वेळा या स्वप्नांचा चुराडा आपल्याच आजूबाजूच्या माणसांच्या हातून होत असतो. याचा प्रत्यय राजकारणातील शिडी चढलेल्या प्रत्येकालाच येतो.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत विजयाचा झंजावात निर्माण करणाऱ्या खा. विशाल पाटील यांनी मिरजेतील सत्कार समारंभाचे वेळी, किंबहुना प्रचाराच्या वेळी अनेक ठिकाणी त्यांच्या विजयात मोलाचा 'हात' असणाऱ्या डॉ. विश्वजीत कदम यांना आता मुख्यमंत्री केल्याशिवाय थांबायचे नाही, असा मनोदय बोलून दाखविला होता. परंतु वस्तुस्थितीची जाणीव असलेल्या डॉ. विश्वजीत कदम यांनी त्याच ठिकाणी खा. विशाल पाटील यांना सबुरीचा सल्ला दिला, ही गोष्ट अलहिदा...


डॉ. विश्वजीत कदम यांची राजकारणातील ताकद सर्वच जाणतात. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचे मोठे मोहोळ अबाधित आहे. यामध्ये केवळ काँग्रेसचेच नव्हे तर पक्षातील नेते, कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. याचा प्रत्यय वेळोवेळी आला आहे. त्यामुळे डॉ. विश्वजीत कदम यांना स्वतःला 'वेगळेपण' सिद्ध करण्याची गरज नाही. परंतु प्रवास रस्त्यावरचा असो किंवा राजकारणातील 'अति घाई संकटात नेई' सूत्र ते जाणतात. म्हणूनच प्रत्येक पाऊल जपून टाकतात... 

तरीही या राजकारणातील 'डार्क हॉर्स' ला त्यांच्या मतदारसंघातच रोखण्याची खेळी किंबहुना कटकारस्थान नेहमीच सुरू असते. केवळ विरोधी पक्ष नव्हे तर स्वपक्षीयातूनही यासाठी रसद पुरविले जाते. मिरजेतील खा. विशाल पाटील यांच्या सत्कार त्यांनी सांगली जिल्ह्यातून चार ते पाच आमदार निवडून आणणार, असे जाहीर केले होते. आणि इथूनच त्यांना रोखण्याच्या खेळ्या सुरू झाल्या. 

सांगली जिल्ह्यात सध्या डॉ. विश्वजीत कदम यांची राजकारणातील वाटचाल वेगाने सुरू आहे. त्यामुळे खासदारकीच्या निवडणुकीत स्पीडब्रेकर ठरलेल्या जिल्ह्यातील मोठ्या नेत्याला हा ' नेतृत्वाचा वड' वाढू द्यायचा नाही. या नेतृत्वाच्या 'त्याच्या सावलीत' जाणारा प्रत्येक जण तृप्त होतो, हे सारेच जाणतात. आणि म्हणूनच या 'वडाला' 'बोन्साय' ठरवण्यासाठी अनेकजण हातात 'कारस्थानाची कैची' घेऊन उभा ठाकला आहे. 'भविष्यात मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत असलेला हा ताकतवान नेता आपल्या वाट्यातील काटा बनायला नको' म्हणून राज्यातूनही प्रयत्न सुरू झाले आहेत.

या साऱ्या कटकारस्थानाला डॉ. विश्वजीत कदम कसा फाटा देतात, यावर त्यांची पुढील वाटचाल सुखकर राहणार आहे. याच निवडणुकीत त्यांच्या विरोधात ठाकलेला देशमुख गट तुल्यबळ झालेला आहे, हे नाकारून चालणार नाही. आणि म्हणूनच डॉ. विश्वजीत कदम यांची आमदारकीची वाट ही बिकट असणार आहे. अर्थात स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्याकडून मिळालेले बाळकडू, राजकारणातील मोठे प्रस्थ असलेले त्यांचे काका मा. मोहनराव कदम, त्यांचे आप्तस्वकीय यांची ताकद मतदार संघात मोठी आहे. याशिवाय डॉ. विश्वजीत कदम यांनी मोठ्या कष्टाने मतदार संघात स्वतःच्या कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे उभारले आहे. ही सारी ताकद. शिवाय स्व. डॉ. पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठाच्या माध्यमातून सागरेश्वर डोंगरापेक्षा मोठा उभारलेला विकास कामांचा डोंगर, त्याला आणखी मोठे करण्याचे डॉ. विश्वजीत कदम यांचे कसब. आणि हे सारे जाणणारा पलूस-कडेगाव मधील मतदार या साऱ्यांची गोळा बेरीज डॉ. विश्वजीत कदम यांना विजयापर्यंत घेऊन जाऊ शकते. 

महाआघाडीतून त्यांना अर्थात काँग्रेस पक्षाला चार ते पाच जागा मिळणार का ? मिळाल्यास तर तेथे उमेदवार कोण असणार ? त्याच्या पाठीशी डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची फौज प्रामाणिकपणे या उमेदवारांच्या मागे राहणार का ? यावर तेथील विजयाचे गणित ठरणार आहे. तोपर्यंत ' जर तर' च्या शक्यतांची, बेरीज वजाबाकीच्या गणिताची शिकवणी चालू राहणार आहे, हे नक्की.