| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ जून २०२४
लोकसभेचं जागा काँग्रेसच्या वाटल्याला येणार अशी खात्री असताना ठाकरे गटाने डाव टाकला अन् चंद्रहार पाटील यांना तडकाफडकी तिकीट जाहीर केलं. पारंपारिक सीट राखणाऱ्या काँग्रेससाठी हा सर्वात मोठा धक्का होता. आधीच मित्रपक्षांना प्राधान्य देण्याचा 'हुकूम' दिल्लीतून आला असताना काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांची कोंडी झाली. त्यात अशोक चव्हाण अन् अनेक नेत्यांच्या रुपात काँग्रेसला धक्के बसत होते. पण सांगलीच्या राजकीय पैलवानांनी तग धरली अन् अशक्य असा विजय मिळवून दिला. राज्यात पक्षसंघटना मरगळली असताना सांगलीतही अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता, अशातच काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन्ही पैलवान अंगावर घेतले अन् राजकारणाची रग दाखवली.
सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळावी यासाठी दिल्लीच्या चकरा सुरू झाल्या. दिल्लीश्वारांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, स्वपक्षानेच वाऱ्यावर सोडलं. काँग्रेससाठी आता आत्मसन्मानाचा प्रश्न उभा राहिला. निवडणूक लढणार कोण? यावर चर्चा सुरू असताना विशाल पाटलांनी दंड थोपटले अन् अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याची तयारी दाखवली. परिणामांना समोरं जाण्याची पूर्ण तयारी विश्वजित कदम यांनी केली होती. पण खरं आव्हान होतं निवडणुकीचं... अंतर्गत जास्त वाद न घातला विशाल पाटलांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला खरा पण उद्धव ठाकरेच सर्वात मोठं आव्हान होतं. उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांसाठी सभा घेतली अन् दणादणून देखील सोडली. त्यामुळे आता विश्वजित कदमांना जोर लावण्याची वेळ आली.
सांगलीत तिन्ही आघाड्यांवरून आमदार विश्वजित कदम यांनी झुंजावती प्रचार केला अन् खऱ्या अर्थाने गेमचेंजर ठरले. तर विशाल पाटलांनी दुधारी तलवार चालवली अन् प्रचारचा झुंजावात केला. काँग्रेस आधीच तळागाळात पोहोचली असताना विशाल पाटलांनी ठिगणी सांगली लोकसभेत आग म्हणून पेटली अन् खऱ्या अर्थाने विशाल पाटलांनी आजोबांचा वारसा कायम ठेवलाय. सांगलीत काँग्रेस जिंकली नाही तर आपण पुढच्या 10 वर्षांसाठी राजकारणातून बाहेर फेकले जाऊ, अशी भीती होती, त्यामुळे काँग्रेसने नेते एकवटले अन् विशाल पाटील यांना दिल्लीच्या संसदेचे दरवाजे दाखवले.
दरम्यान, सांगली लोकसभेसाठी यंदा जवळपास 61 टक्के मतदान झालं. जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी चंद्रहार पाटलांना मदत न करता अपक्ष असलेल्या विशाल पाटलांना साथ दिली अन् काँग्रेसला सांगलीत पुन्हा बळ दिलंय. काँग्रेसच्या एकीच्या बळातं कौतूक जरी होत असलं तरी खरी कमाल दाखवली ती विशाल पाटलांनी... त्यामुळे खऱ्या अर्थाने सांगलीचा पठ्ठ्या खऱ्या अर्थाने वसंतदादांना नातू शोभला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.