| सांगली समाचार वृत्त |
बार्बाडोस - दि. ३० जून २०२४
टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (२९ जून) बार्बाडोसला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात झाला. या सामन्यात भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवला आणि दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपचे विजेतेपद जिंकले. हा सामना भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसाठीही अखेरचा सामना ठरला. या सामन्यासह त्याचा भारतीय संघाबरोबरचा मुख्य प्रशिक्षक म्हणून अखेरचा सामना ठरला.
विशेष म्हणजे अखेरच्या सामन्यात त्याला भारतीय संघाने टी२० वर्ल्ड कप विजयाची अनमोल भेटही दिली. त्यामुळे आता द्रविडने प्रशिक्षक म्हणून दोन वर्ल्ड कप जिंकले. यापूर्वी तो प्रशिक्षक असताना १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०१८ साली भारतीय संघाने जिंकला होता.
दरम्यान, शनिवारी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माकडे टी२० वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी सोपवल्यानंतर भारतीय संघाने जोरदार सेलीब्रेशन केले. इतकेच नाही, तर जेव्हा ही ट्रॉफी द्रविडच्या हातात सोपवली, तेव्हा त्याने अगदी लहान मुलासारखं जोरदार ओरडत सेलीब्रेशन केले. त्याचे असे सेलीब्रेशन करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
विशेष म्हणजे द्रविड नेहमीच शांत खेळाडू म्हणून समजला जातो. तो बऱ्याचदा त्याच्या भावना व्यक्त करत नाही. मात्र भारताने अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर टी२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मात्र त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा वेस्ट इंडिजमध्ये झाली. याच वेस्ट इंडिजमध्ये २००७ साली झालेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत द्रविडच्या नेतृत्वात खेळलेल्या भारतीय संघाला पहिल्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. मात्र आता त्यानंतर १७ वर्षांनी द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने टी२० वर्ल्ड कप जिंकला आहे.