Sangli Samachar

The Janshakti News

आयुर्वेदिक डॉक्टरांनाही 'ऑपरेशन'चे अधिकार : डॉ. मनोज नेसरी



| सांगली समाचार वृत्त |
नाशिक - दि. १७ जून २०२४
भारतीय नागरिकांचा आयुर्वेद उपचार पद्धतीवरील विश्‍वास दृढ होत असताना परदेशी नागरिकांना भारतात आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी स्वतंत्र 'आयुष व्हिसा' देण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. आयुर्वेदिक डॉक्टरांना रुग्णाचे 'ऑपरेशन' करण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले जाते.

परंतु, हे पूर्णत: खोटे असून, केंद्र सरकारने २०१७ मध्ये कायद्यात केलेल्या बदलांच्या आधारे आयुर्वेद डॉक्टरांनाही 'ऑपरेशन'चे अधिकार असल्याची माहिती आयुष मंत्रालयाचे आयुर्वेदिक विभागाचे सल्लागार डॉ. मनोज नेसरी यांनी दिली. महाकवी कालिदास कलामंदिरात दोन दिवसांपासून आयोजित जिज्ञासा आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप झाला. 


या वेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, आरोग्य विज्ञान विद्यापीठातील आयुष विभागाच्या समन्वयक डॉ. गीतांजली कारले, शिक्षणतज्ज्ञ सचिन जोशी, 'अभाविप'चे नाशिक महानगर अध्यक्ष प्रा. प्रदीप वाघ, महानगर मंत्री ओम माळूंजकर, जिज्ञासा आंतरराष्ट्रीय परिषदेचे सचिव डॉ. रोहन मुक्के, संयोजक डॉ. रजनी गायकवाड व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. नेसरी हे आयुर्वेदाचे महत्त्व सांगताना म्हणाले, की राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार देशातील ५६ टक्के व्यक्ती आयुर्वेदिक उपचार घेत आहेत. त्यामुळे तीन कोटी डॉलरची अर्थव्यवस्था असलेली आयुर्वेद उपचार पद्धती आता १८ कोटी डॉलरपर्यंत पोहोचली आहे. केवळ भारतीयांनाच आयुर्वेदिक उपचार मिळावेत असे नाही, तर आयुर्वेदिक टुरिझम विकसित करण्यासाठी भारत सरकारने आता विदेशी नागरिकांना आयुष व्हिसा देण्यास सुरवात केली आहे.

अधिकृत उपचार देण्यासाठी देशातील ४०० आयुर्वेद महाविद्यालये व डॉक्टर यांना अधिकृत नोंदणी करण्याची सूचना दिली. तसेच, विद्यार्थ्यांना आता बायोटेक्नॉलॉजी व आयुर्वेद या विषयांत एकाच वेळी पीएच.डी.साठी येणे शक्य झाल्याचेही डॉ. नेसरी यांनी सांगितले. याज्ञवल्क्य शुक्ल म्हणाले, की तरुणांनी आयुर्वेद- योग- होमिओपथी अशा आयुष चिकित्सा पद्धतीचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून आपल्या देशाच्या आरोग्य सेवेत आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. 

आयुर्वेदातील ६४ कला अवगत करून २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन डॉ. मिलिंद निकुंभ यांनी केले. रोहन मुक्के यांनी परिषदेचा उद्देश स्पष्ट केला. सचिन जोशी यांनी अतिथींचे स्वागत केले. दिवसभरात विविध विषयांतील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी देशभरातील एक हजार ३०० आयुर्वेदिक अभ्यासाचे विद्यार्थी उपस्थित होते.

प्रत्येक गावात आयुर्वेद आरोग्य केंद्र 

ग्रामीण भागातील प्रत्येक गावात 'ॲलोपथी'चे प्राथमिक उपचार मिळतात. त्याच पद्धतीने प्रत्येक गावात आयुर्वेदिक प्राथमिक उपचार केंद्र सुरू करण्यासाठी जिज्ञासा परिषदेचे आयोजन केले आहे. यापुढील लढाई ही आयुर्वेद उपचार केंद्र सुरू करण्याची असेल, त्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांनी सज्ज राहण्याचे आवाहन 'अभाविप'चे राष्ट्रीय महामंत्री शुक्ल यांनी केले आहे.