Sangli Samachar

The Janshakti News

अणुबॉम्ब नाहीतर या व्हायरसमुळे होईल पृथ्वीचा अंत, संशोधकांचा दावा !


सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २७ जून २०२४
जगाचा विनाश केव्हा आणि कसा होणार, हा गेल्या काही वर्षांत औत्सुक्याचा विषय ठरला आहे. खरं तर संशोधक या विषयावर सातत्याने संशोधन करत आहेत. या संशोधनातून काही निष्कर्ष देखील समोर आले आहेत. पण याबाबत ठोस निष्कर्ष स्पष्ट झालेले नाहीत. या बाबत एका संशोधकाने नुकताच महत्त्वाचा दावा केला आहे. यानुसार, एक बुरशी मानवजातीच्या नाशाला कारणीभूत ठरू शकते. ही बुरशी नेमका कसा परिणाम करेल, संशोधकांनी नेमका काय दावा केला आहे.

जगाचा विनाश कसा होईल, या बाबत सामान्य लोकांसह संशोधकांना औत्सुक्य आहे. यावरून अनेक प्रकारचे अंदाज व्यक्त केले जातात. काही लोकांच्या मते अणुयुद्धामुळे जगाचा विनाश होईल. तर काहींच्या मते कोविड -19 सारख्या विषाणूमुळे जगाचा विनाश होऊ शकतो. पण प्रसिद्ध संशोधक, मॉलिक्युलर मायक्रोबायोलॉजी, इम्युनॉलॉजी आणि संसर्गजन्य आजार या विषयांचे प्राध्यापक आर्टुरो कॅसडेव्हल यांनी या दोन्हींपेक्षा वेगळा दावा केला आहे. `बुरशीमुळे मानवजातीचा नाश होऊ शकतो,` असं मत कॅसडेव्हल यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की,`पेड्रो पास्कल आणि बेला रामसे यांचा अभिनय असलेली एचबीओवरील हिट मालिका 'द लास्ट ऑफ अस'मध्ये ज्याप्रमाणे लोक संक्रमित होताना दिसले, त्याचप्रमाणे आपण सर्वजण नष्ट होऊ शकतो. ही टीव्ही मालिका पोस्ट अपोकॅलिप्टिक जगावर आधारित आहे. यात एखाद्या बुरशीचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला तर बहुतांश मानवजात कशी नष्ट होऊ शकते, हे दाखवलं आहे.`

कॉर्डिसेप्स विषाणूमुळे जगाचा विनाश होऊ शकतो. कॉर्डिसेप्स हा बुरशीचा विषाणू आहे. याचा संसर्ग झालेल्या व्यक्ती झोम्बीसारख्या (काल्पनिक प्राणी) राक्षसीवृत्तीच्या बनतात. इतरांना चावा घेऊन किंवा त्यांचे लहान बीजाणू इतर व्यक्तींमध्ये संक्रमित करून ते नवीन झोम्बी बनवतात. कॉर्डिसेप्स ही बुरशीची एक प्रजाती असून, त्यात 400 पेक्षा जास्त उपप्रजातींचा समावेश आहे. ही बुरशी तिच्या अनोख्या जीवनचक्रासाठी ओळखली जाते. त्यात परजीवी कीटक आणि इतर ऑर्थोपॉ़ड्सचा समावेश होतो. कॉर्डिसेप्स सायनेन्सिस आणि कॉर्डिसेप्स मिलिटरिस या सर्वांत प्रसिद्ध प्रजाती मानल्या जातात. अमेरिकेतली बाल्टिमोर येथील प्रसिद्ध जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये कार्यरत असणारे 67 वर्षांचे प्रा. कॅसडेव्हल यांनी सांगितलं की, `ही बुरशी मानवजातीसाठी वास्तविक धोका आहे. त्यांनी अनेक निष्कर्षांवर आधारित 'व्हॉट इफ फंजाय विन' नावाचं पुस्तक लिहून मे 2024 मध्ये प्रकाशित केलं आहे. हे पुस्तक बुरशीमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य महामारीवर प्रकाश टाकतं.'

'द गार्डियन'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, 'अद्याप अशी कोणतीही बुरशी आढळून आलेली नाही, जी लोकांना झोम्बी बनवू शकते. पण येत्या काळात धोकादायक बुरशीजन्य संसर्ग दिसून येईल, असा विश्वास आहे. कारण आम्ही असा प्रकार या पूर्वी पाहिला आहे.' 'विशिष्ट बुरशीमध्ये नवीन आजार निर्माण करण्याची क्षमता असल्याचे ठोस पुरावे मिळत आहेत. हे आम्ही या पूर्वी कधीही पाहिलेले नाहीत. तसेच यामुळे अनेक लोकांवर परिणाम होऊ शकतो. हवामान बदलामुळे मानवात बुरशीजन्य नवीन आजार पसरण्याची शक्यता आहे. मात्र हे होण्यासाठी बुरशी किंवा बुरशीजन्य जीवांना उष्ण तापमानाशी जुळवून घेणं गरजेचं आहे. बहुतांश बुरशी 37 अंश सेल्सियस या शरीराच्या तापमानात जगू शकत नाही. पण काही बुरशी यावर मात करण्यासाठी अनुकूल आहेत,' असं प्रा. कॅसडेव्हल यांनी सांगितलं.