Sangli Samachar

The Janshakti News

भाजपा पाठोपाठ काँग्रेसही भाकरी पलटणार; नानांना "टाटा" ?


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १८ जून २०२४
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं आत्मपरिक्षण आता सगळ्याचं पक्षातील नेत्यांकडून केलं जात आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसह आता कॉंग्रेस पक्षात देखील मोठे बदल केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच राज्यात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पत्ता देखील कट करून दुसऱ्या फळीतील नेत्यांकडे प्रदेशाध्यक्ष पद देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत राज्यात कॉंग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. कोणाच्या ध्यानीमनी नसताना पक्षानं राज्यात १३ जागा लढवल्या. सांगलीत विशाल पाटलांच्या रूपात कॉंग्रेसचा बंडखोर विजयी झाला. त्यामुळे महाविकास आघाडीत कॉंग्रेसचं महत्व वाढलं आहे. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि इंडिया आघाडीची कामगिरी चांगली झाली. त्यानंतर आता कॉंग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. कॉंग्रेसचे जवळपास अर्धा डझनहून अधिक प्रदेशाध्यक्ष, काही राज्यांचे प्रभारी सरचिटणीस बदलण्यात येणार आहेत.


हिमाचल प्रदेश, झारखंड, उत्तराखंड, मध्यप्रदेश पश्चिम बंगालच्या प्रदेशाध्यक्षांना पदावरून दुर केलं जाण्याची दाट शक्यता आहे. तर तेलंगणात मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष अशा दुहेरी भूमिकेत असलेल्या रवेंत रेड्डींना प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मोकळं केलं जाऊ शकतं. महाराष्ट्रात कामगिरी चांगली झाली. पण यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा वाटा नेमका किती, हा प्रश्न आहे.

कॉंग्रेसच्या यशात केंद्र सरकारविरोधातील नाराजीचा मोठा वाटा आहे. कॉंग्रेसच्या जिल्हाय पातळीवरील नेत्यांनी आपापली कामगिरी चोख बजावल्यानं पक्षाला दणदणीत यश मिळालं. त्यामुळे कॉंग्रेसच्या विजयात दुसऱ्या फळीतील नेत्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीआधी यापैकी एखाद्या नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपद जाऊ शकतं.