| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १० जून २०२४
राष्ट्रवादीला सरकारच्या वतीने एक जागा ऑफर करण्यात आली होती. राज्यमंत्रिपद - स्वतंत्र प्रभार अशी ती जागा होती. पण त्यांचा आग्रह असा होता की, राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल यांचे नाव निश्चित आहे आणि ते याआधी केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे राज्यमंत्री - स्वतंत्र प्रभार करता येणार नाही. पण जेव्हा युतीचे सरकार असते तेव्हा काही निकष तयार केलेले असतात. एका पक्षाकरता ते निकष बदलता येत नाहीत. त्यामुळे मला विश्वास आहे की जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा त्यांचा विचार नक्की केला जाईल. आताही आमच्याकडून समावेश करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पण त्यांनीच सांगितले की, यावेळी शक्य नसल्यास पुढच्या वेळी द्या, पण आम्हाला राज्यमंत्रिपदाऐवजी मंत्रिपद द्या, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दरम्यान महाराष्ट्रातून काही अनुभवी आणि काही युवा खासदारांना मोदींच्या एनडीए सरकारमध्ये संधी मिळाली आहे. त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. नितीन गडकरी, पीयूष गोयल, रामदास आठवले, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांसह शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे सर्व जण मंत्रिमंडळात येत आहेत, याबद्दल मला आनंद आहे. या सर्वांचे अभिनंदनही करतो, असेही फडणवीस म्हणाले.