Sangli Samachar

The Janshakti News

टीम इंडियाचा सनसनाटी वर्ल्ड कप विजयानंतर, रोहित विराटसह हार्दिकला आनंदाश्रू !


| सांगली समाचार वृत्त |
बार्बाडोस - दि. ३० जून २०२४
टीम इंडियाने अखेर 17 वर्षांची प्रतिक्षा संपवली आहे. टीम इंडियाने 2007 नंतर आता रोहित शर्माच्या नेतृत्वात टी 20 वर्ल्ड कप जिंकला आहे. टीम इंडियाने चित्तथरारक सामन्यात दक्षिण आफ्रिके विरुद्ध 7 धावांनी थरारक विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांची शानदार बॉलिंग आणि सूर्यकुमार यादव याने घेतलेला गेमचेंजिंग कॅचने सामना फिरवला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावला. टीम इंडियाच्या या विजयानंतर कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली आणि उपकर्णधार हार्दिक पंड्या हे तिघे भावूक झाले. तिघांना अश्रू अनावर झाले. विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी एकमेकांना घट्ट मीठी मारत एकमेकांचं अभिनंदन केलं.

सामन्यात काय काय झालं ?

टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 176 धावा केल्या. विराट कोहली याने सर्वाधिक 76 धावा केल्या. अक्षर पटेलच्या 47 धावा महत्त्वपूर्ण ठरल्या. तर अखेरीस शिवम दुबे याने 16 बॉलमध्ये 27 धावांची निर्णायक खेळी केली. तर रोहित शर्मा 9, रवींद्र जडेजा 2 आणि हार्दिक पंड्याने 5 धावांचं योगदान दिलं. तर दक्षिण आफ्रिकेकडून एनरिख नॉर्खिया आणि केशव महाराज या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मार्को जान्सेन आमि कगिसो रबाडा या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.


प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेची अडखळत सुरुवात झाली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची 2 बाद 12 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर क्विंटन डी कॉक आणि ट्रिस्टन स्टब्स या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली. त्यानंतर स्टब्स 31 धावांवर आऊट झाला. त्यानंतर क्विंटन डी कॉक आणि हेन्रिक क्लासेन या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 36 धावांची भागीदारी केली. त्यानंतर डी कॉक 39 धावावंर बाद झाला.

मात्र हेन्रिक क्लासेन मैदानात होता. त्यामुळे टीम इंडियाला टेन्शन होतं. क्लासेनने गगनचुंबी सिक्स मारत जोरदार फटकेबाजी केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजय दृष्टीक्षेपात होता. मात्र अजून सामना संपला नव्हता. हार्दिक पंड्याने डावातील 17 व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर क्लासेनला ऋषभ पंतच्या हाती 52 धावांवर कॅच आऊट केलं. टीम इंडियाने इथून कमबॅक केलं.

त्यानंतर जस्प्रीत बुमराहने मार्को जान्सेनला 2 धावांवर बोल्ड केलं. आता टीम इंडियाच्या विजयात डेव्हिड मिलर आडवा होता. याचा सूर्यकुमार यादवने बाउंड्री लाईनवर अफलातून रिले कॅच घेत सामना टीम इंडियाच्या खिशात घातला. हार्दिकच्या बॉलिंगवर मिलर 21 धावांवर आऊट झाला. तर कगिसो रबाडा 19.5 बॉलवर 1 धावांवर आऊट झाला. हार्दिकने शेवटच्या ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेला टीम इंडियाने 8 बाद 169 धावांवर रोखलं.