yuva MAharashtra 'ब्रेन डेड' व्यक्तीचे केले अवयवदान, एकास जीवदान तर दोघांना दृष्टी; वाहतूक शाखेचे कौतुकास्पद काम !

'ब्रेन डेड' व्यक्तीचे केले अवयवदान, एकास जीवदान तर दोघांना दृष्टी; वाहतूक शाखेचे कौतुकास्पद काम !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १४ जून २०२४
ते मुळचे बोरगावचे...शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून निवृत्त झाले. दोन मुलींसह मुलासा उच्चशिक्षित केले. चार दिवसांपुर्वी अचानक त्यांना त्रास जाणवू लागला. आणि त्यांचे मेंदुचे कार्य थांबले (ब्रेन डेड). अवयवांच्या रूपाने त्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात या विचाराने मुलांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. 

अवयवदानाचा निर्णय झाला. यकृत देवून एकास जीवदान दिले, तर दोघांना डोळे देत दृष्टी देण्यात आली. सांगली वाहतूक शाखेच्या मदतीने सांगलीतून ग्रीन कॉरिडॉर करत यकृत पुण्याला नेण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणारी कामगिरी आज उषःकाल हॉस्पिटलच्या माध्यमातून दुसऱ्यांदा फत्ते केली.

उषःकाल मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात बोरगाव येथील निवृत्त अधिकारी शिवाजी नाईक यांना दाखल केले. त्यांचे ब्रेन डेड झाल्याने कुटुंबीयांच्या मान्यतेने अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यासाठी रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मिलिंद पारेख, वैद्यकीय संचालक डॉ. अजित मालाणी यांनी कुटुंबीयांचे समुपदेशन केले.

आपला माणूस तीन जणांच्या आयुष्यात तेवत राहील, या भावनेने नाईक कुटुंबियांचे अश्रू अनावर झाले. पुण्यातील डीवाय पाटील रुग्णालयात एका रुग्णास यकृताची गरज होती. त्यानुसार तत्काळ देण्याचा निर्णय घेतला. तेथील डॉक्टर उषःकाल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यानंतर तातडीने सारी प्रक्रिया पुर्ण केली. सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास रुग्णवाहिका सज्ज केली.

पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रीन कॉरिडॉर राबवले. यकृत ठराविक वेळेत पुण्याला नेणे गरजेचे होते. रुग्णवाहिकेनेने नेण्याचे नियोजन झाले. सांगली वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सारे नियोजन करत टीम तयार झाली. सायंकाळी रुग्णवाहिकेचे पुढे पोलिस गाडी सायरन देत निघाली. कर्नाळ-नांद्रे मार्गे पाचवा मैल, पलूस मार्गे कराडला ताफा दाखल झाला.

50 मिनिटांत सांगली जिल्ह्याची हद्द सोडण्यात आली. उषःकाल हॉस्पिटलमधून निघाल्यानंतर अडीच तासात पुण्यात रुग्णवाहिका पोहचली आणि यकृत प्रत्यारोपणाची प्रक्रिया सुरू झाली. तसेच सांगलीतील दोन रुग्णांना नेत्रदान करण्यात आले. रुग्णवाहिकेचे चालक राहुल धबाडगे, बाळू खरात, मारूती गिरी यांनी सारथ्य केले.

नोव्हेंबर महिन्यांतच परवानगी मिळाल्यानंतर पहिल्यांना अवयव पाठवण्यात आले. त्यानंतर दुसऱ्यांदा ही कामगिरी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मिलिंद पारेख, डॉ. आनंद मालाणी, डॉ. संजय कोगेकर, डॉ. दिगंबर माळी यांच्या टीमने फत्ते केली.


पोलिस लेकीचे, डोळे पाणावले

शिवाजी नाईक यांना दोन मुली आणि एक मुलगा. त्यातील मोठी मुलगी सांगली पोलिस दलात भरती झाली. प्रेरणा नाईक त्यांचे नाव. त्या सध्या विश्रामबाग पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. यावेळी त्या पोलिस लेकीचे डोळे पाणावले होते. बोलताना म्हणाल्या,''बाबांचे अकाली जाणे मनाला चकटा लावणार आहे. परंतू त्यांच्या अवयवांमुळे तिघांना नवजीवन मिळणार आहे. त्यामुळे आमचे बाबा नेहमीच आमच्या राहतील.''

'' उषःकाल हॉस्पिटलला ब्रेन डेड रुग्णाचे अवयव काढून देण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर दुसऱ्यांहा हे अवयव यशस्वीरित्या काढून पाठवण्यात आले. यातून एकास जीवदान तर दोघांना दृष्टी मिळणार आहे. पोलिस दलासह जिल्हा आरोग्य यंत्रणेचे मोठे सहकार्य मिळाले. ''

डॉ. आनंद मालाणी,
उषःकाल अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस