yuva MAharashtra सांगलीत पुन्हा उडणार धुरळा? विश्वजीत कदम यांनी पाच जागांवर केला दावा; मविआत पुन्हा पेच वाढण्‍याची शक्‍यता !

सांगलीत पुन्हा उडणार धुरळा? विश्वजीत कदम यांनी पाच जागांवर केला दावा; मविआत पुन्हा पेच वाढण्‍याची शक्‍यता !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ जून २०२४
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सांगली लोकसभा मतदारसंघातील निवडणूक विशाल पाटील यांनी केलेली बंडखोरी चर्चेत होती. विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आणि ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील व महायुतीचे उमेदवार या दोघांचा त्यांनी पराभव केला. 

लोकसभा निवडणुकांनंतर या वादावर पडदा पडल्याचे वाटत असतानाच आता विधानसभा निवडणुकांमध्येही सांगलीचा सुरुंग महाविकास आघाडीत पेच निर्माण करण्याची शक्यता आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. पण यातल्या पाच विधानसभा मतदारसंघांवर विश्वजीत कदम यांनी काँग्रेसच्या वतीने दावा सांगितला आहे. विशाल पाटील यांच्यासाठी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.


कुणी काहीही बोलो, या जिल्ह्यात ४ किंवा ५ जागांवर काँग्रेस पक्ष १०० टक्के लढणार. त्या जिंकून आणणार. हा आमचा निश्चय आहे. अंतर्गत काही प्रश्न आहेत. ते नक्कीच विचारार्थ घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, असे विश्वजीत कदम म्हणाले. तसेच लोकसभा निवडणुकीत काय त्रास सोसावा लागला हे आमचे आम्हाला माहिती. किती संघर्ष करावा लागला. काही गोष्टी मला जास्त सोसाव्या लागल्या आणि काही गोष्टी उमेदवार म्हणून विश्वास पाटलांनाही जास्त सोसाव्या लागल्या, असेही ते म्हणाले. पण यावेळी त्यांचा रोख नेमका कुणाच्या दिशेने होता, यावर आता तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

मी एक माणूस लोकसभेत पाठवला आहे, तसंच या जिल्ह्यातून एक काय, दोन आमदार इथून विधानसभेवर पाठवण्याची जबाबदारी माझी आहे. फक्त वातावरण खराब होईल असं काही करू नका. खडा टाकणारी माणसं बरीच आहे. ज्यांनी खडे टाकायचे प्रयत्न केले, त्यांना त्यांची जागा लोकसभेच्या निवडणुकीत दाखवली आहे. पुन्हा ते खडे टाकायची हिंमत करणार नाहीत", असं सूचक विधानही विश्वजीत कदम यांनी केलं आहे.