Sangli Samachar

The Janshakti News

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे सामाजिक न्यायाचे काम आजही मार्गदर्शक - जिल्हाधिकारी !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ जून २०२४
मराजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक न्यायाबाबत केलेले काम आजही सर्वांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे. शासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी यातून प्रेरणा घेऊन शासकीय योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती (सामाजिक न्याय दिन) व आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिनानिमीत्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सांगली येथील सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधिक्षक संदीप घुगे, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष नंदिनी आवाडे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत, बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक अमित घवले आदी उपस्थित होते.

राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षण विषयक केलेल्या कार्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी माहिती देऊन माणसाचे भविष्य सुखकर करण्याचे एकमेव साधन शिक्षण असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोणीही अंमली पदार्थांचे सेवन करू नये असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.


राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजाचा विकास ही बाब मध्यवर्ती ठेवून ज्या संवेदनाशीलवृत्तीने काम केले ती सर्वांनी अंगीकारावी असे आवाहन 
मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी यावेळी बोलताना केले. शालेय विद्यार्थ्यांना व्यसनापासून परावृत्त करण्याकामी शाळांमध्ये प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्याचे महत्वही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

पोलिस अधिक्षक संदिप घुगे यांनी सर्वांना सामाजिक न्याय दिनाच्या शुभेच्छा देवून अंमली पदार्थ विरोधी कायदा, त्यातील शिक्षेची तरतूद याबाबत माहिती दिली. 

जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष नंदिनी आवाडे यांनीही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याबाबत माहिती दिली.
प्रा. कैलास काळे यांनी राजर्षी शाहू महाराजांचा जीवनपट यावर माहिती दिली. साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त तानाजी जाधव यांनी देशभक्तीपर गीते, विविध प्राणी व पक्ष्यांचे आवाज यातून स्वच्छता, साक्षरता, व्यसनमुक्तीची गरज इत्यादीबाबत प्रबोधनपर व्याख्यान दिले.
प्रारंभी प्रतिमापूजन व दीप प्रज्वलनानंतर उपस्थित सर्वांनी व्यसनमुक्तीबाबत शपथ घेतली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल भाईदास जाधव यांनी केले. सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास समाज कल्याण कार्यालयाचे कर्मचारी, शासकीय वसतिगृहे व निवासी शाळांचे अधिक्षक, अधिक्षीका, मुख्याध्यापक व विद्यार्थी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनीधी, समाजसेवक व नागरिक उपस्थित होते.