| सांगली समाचार वृत्त |
विटा - दि. १६ जून २०२४
पोलीस असल्याची बतावणी करत आपले नकली ओळखपत्र दाखवून पती-पत्नीकडील सुमारे दोन लाखाचे सोन्याचे दागिने लंपास करण्याचा प्रकार विट्याजवळ मायणी रस्त्यावर घडला. याप्रकरणी विटा पोलीस ठाण्या अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळासो दगडू जाधव (वय ६६, रा. आगलावे मळा, गुरसाळे, ता. खटाव जि. सातारा) विटा-मायणी रस्त्यावरून दुचाकीवरून जात असताना दुचाकीवरून आलेल्या एका तरुणाने थांबवून पुढे भोसका-भोसकी झाली आहे. तुम्ही तुमच्याजवळ असलेले सोन्याचे दागिने पिशवीत ठेवा असे सांगून दागिने पिशवीत ठेवत असताना हातचलाखी करून काढून घेतले. आणि दुचाकीवरून पोबारा केला. लंपास केलेल्या दागिन्यामध्ये दोन सोनसाखळ्या, एक ३५ ग्रॅम वजनाची तीनपदरी सोनसाखळी असा ऐवज होता. याचे मुल्य १ लाख ९२ हजार रुपये आहे.
दरम्यान, असाच प्रकार एका वृद्ध महिलेबाबत सांगलीजवळ धामणी रोडवर शुक्रवारी सकाळी घडला. राजश्री रामचंद्र गायकवाड (वय ६५ रा.जुना धामणी रोड) या सकाळी प्रभात फेरीसाठी गेल्या असता समोरून आलेल्या दुचाकीस्वाराने तुमच्या पाटल्या माझ्याकडे द्या, मी सुरक्षित घरी पोहोचवतो असे सांगत महिलेच्या हातातील १ लाख ४० हजाराच्या सोन्याच्या पाटल्या जोडीदाराच्या हाती दिल्या. यानंतर दोघेही दुचाकीवरून पसार झाले. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.