yuva MAharashtra चंद्राबाबू आणि नीतिशकुमार यांचे दबाबतंत्र; भाजपकडे केली महत्त्वाची मागणी !

चंद्राबाबू आणि नीतिशकुमार यांचे दबाबतंत्र; भाजपकडे केली महत्त्वाची मागणी !



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ५ जून २०२४
लोकसभा निवडणूक निकालानंतर आता देशातील सत्तेची समीकरणे चांगलीच बदलली आहे. भाजपला 240 जागांवर विजय मिळाला आहे. मागील 10 वर्षात भाजपला बहुमतापेक्षा कमी संख्याबळ मिळाले आहे. त्यामुळे आता केंद्रात सलग तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन करण्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. दोन्ही पक्षांनी भाजपवर दबाव तयार करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे वृत्त आहे. 

'इंडियन एक्सप्रेस'ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात हा दावा केला आहे. नितीशकुमार आणि चंद्राबाबू यांनी लोकसभेचे अध्यक्षपदावर दावा केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता, भाजप नेतृत्त्व काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाकडे लक्ष लागले आहे.

लोकसभा अध्यक्षपदाची मागणी का ?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भविष्यात संभाव्य पक्ष फुटीपासून आघाडीतील मित्र पक्षांना वाचवण्यासाठी दोन्ही पक्षांनी हे पाऊल उचलल्याचे सूत्रांनी सांगितले. पक्षांतरविरोधी कायद्यात सभापतींची भूमिका महत्त्वाची असते. सूत्रांनी सांगितले की, टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू आणि जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांनीही अध्यक्षपदासाठी भाजपच्या इतर काही मित्रपक्षांशी चर्चा केली आहे. मात्र, बुधवारी नवी दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत नायडू आणि नितीशकुमार अधिकृतपणे ही मागणी मांडतील की नाही हे स्पष्ट झालेले नाही. या बैठकीला दोन्ही नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

पक्षांतराच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयालाही मर्यादित अधिकार आहेत. अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यात लोकसभा अध्यक्षांनी पक्षपाती भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. मावळत्या लोकसभा अध्यक्षांसमोर अपात्रतेची प्रकरणे प्रलंबित होती. त्याशिवाय, महाराष्ट्रातही शिवसेना पक्षफुटी प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढल्यावर निर्णय घेतला होता. पक्ष फुटीपासून वाचण्यासाठी लोकसभा अध्यक्षपद महत्त्वाचे ठरत असल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळेच आता तेलगू देसम आणि जेडीयूकडून लोकसभा अध्यक्षपदाची मागणी करण्यात आली असावी अशी चर्चा आहे.

वाजपेयींच्या काळात मित्रपक्षांना मान, मोदींकडून दुर्लक्ष ?

अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात केंद्रात भाजपची सत्ता असताना लोकसभेचे अध्यक्षपद हे मित्रपक्षांना देण्यात आले होते. तेलगू देसम पक्षाचे जीएमसी बालयोगी, शिवसेनेचे मनोहर जोशी यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपला बहुमत मिळाल्यानंतर मित्रपक्षांना अध्यक्षपद देण्यात आले नव्हते. त्याशिवाय, लोकसभेच्या उपाध्यक्षपदी देखील निवड करण्यात आली नव्हती. लोकसभेच्या उपाध्यक्षपद हे विरोधी पक्षांकडे देण्यात येते. 

लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागांवर विजय मिळाला ?

देशपातळीवरील समीकरणं

एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17

महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल

महाविकास आघाडी- 29
महायुती- 18
अपक्ष- 1

महायुतीमधील पक्षीय बलाबल

भाजप- 9
शिवसेना (शिंदे गट)-7
राष्ट्रवादी काँग्रेस-1


महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?

काँग्रेस- 13
ठाकरे गट-9
शरद पवार गट-8