Sangli Samachar

The Janshakti News

गुरुजींनी घेतला मुख्यधापकांसह शिक्षण संस्था चालकांचा धडा !

सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. २७ जून २०२४
देशाची भावी पिढी घडविणारे शैक्षणिक क्षेत्रात त्यातील चांगल्या कामाऐवजी चुकीच्या आणि गैरकारभाराबाबतच अधिक गाजत असते. यामध्ये बोगस बिलांपासून बोगस विद्यार्थी घडवण्यांपर्यंत अनेक कारणे घडत असतात. कधी याची वाचता होते, तर कधी प्रकरण पैशाचा जोरावर दाबले जाते. त्यामुळे काही मूठभर लोकांमुळे संपूर्ण शैक्षणिक क्षेत्र बदनाम होते.

सांगली जिल्हा हा अशा कारनाम्यांना अपवाद नाही. वेळोवेळी असे अनेक गैरप्रकार उघडकीस येतात. प्रकरणाची चर्चा होते, ती गाजते. पण जितक्या वेगाने व्हायरल होते तितक्या वेगानेच ती शांतही होते. त्यामुळेच अशा गैरकारभार करणाऱ्यांचे फावते. असाच एक प्रकार नुकताच सांगली महापालिका क्षेत्रातील विजयनगर येथे घडला. येथील एका हायस्कूल व कनिष्ठ कनिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक शिक्षकाला संस्थेच्या सचिव व मुख्याध्यापकाने बोगस राजनामा पत्र तयार करून नोकरीवरून कमी केले. 

तेव्हा या शिक्षकाने अध्यक्ष सचिव व शाळेच्या मुख्याध्यापकाविरोधात न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष सचिव व शाळा मुख्याध्यापकावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. उमेश तानाजी जाधव असे या शिक्षकाचे नाव असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुख्याध्यापक ईश्‍वर आप्पा मल्लाप्पा बिराजदार, (रा. स्वप्ननगरी, कुंभारमाळा, सांगली), वाळवा तालुका बौद्ध सोसायटीचे सचिव विवेक धनवडे आणि अध्यक्ष दीपक धनंजय धनवडे ( दोघेही राहणार वाळवा ) यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.

वाळवा तालुका बौद्ध सोसायटी यापूर्वीही अनेक कारणाने गाजली असल्याची चर्चा सांगली जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात सुरू आहे. अर्थात संस्थेचे अध्यक्ष दीपक धनंजय धनवडे यांनी वेळोवेळी याचा इन्कार केला आहे. आताही वानलेसवाडी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक बिराजदार यांनी उमेश जाधव यांच्या आरोपाचा इन्कार केला असून त्यांनी स्वतःहून टपालाने राजीनामा संस्थेकडे पाठवला असल्याचा खुलासा केला आहे त्यामुळे संस्थेच्या आदेशानुसार जाधव यांना शाळेत हजर करून घेतले नाही, तसेच त्यांना कोणताही मानसिक त्रास दिलेला नाही असे बिराजदार यांनी म्हटले आहे.