yuva MAharashtra फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची जुनी अप्रकाशित बखर; नेमकं काय आहे बखरीत आणि कशी मिळाली ही बखर?

फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची जुनी अप्रकाशित बखर; नेमकं काय आहे बखरीत आणि कशी मिळाली ही बखर?



| सांगली समाचार वृत्त |
कोल्हापूर - दि. १४ जून २०२४
नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्स'मध्ये इतिहास संशोधनासाठी लागणारी काही जुनी कागदपत्रे चाळत असताना पुणे येथील इतिहास संशोधक आणि लेखक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दाणी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची जुनी अप्रकाशित बखर सापडली आहे. मोडी लिपितील (Modi Script) हस्तलिखित स्वरूपात असलेली ही सन १७४० नंतर लिहिलेली बखर आत्तापर्यंत मिळालेल्या सर्व एक्क्याण्णव कलमी बखरींचा पूर्वसुरी दस्तावेज मानला जातो. छत्रपती शिवरायांची पूर्ण कारकीर्द आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीचा प्रारंभ या बखरीत आलेला आहे.

इतिहास संशोधक गुरुप्रसाद मूळचे कोल्हापुरातील शुक्रवार पेठेतील आहेत. त्यांचा जन्म, शिक्षण येथेच झाले आहे. नोकरीनिमित्त ते पुणे येथे राहत आहेत. मनोज हे मूळचे पुण्यातील असून ते सध्या नोकरीनिमित्त अमेरिकेत आहेत. त्यांना इतिहास संशोधन, लेखनाची आवड आहे. सहा महिन्यांपूर्वी फ्रान्समधील 'बीएनएफ' येथील हस्तलिखित पान विभागात जुनी कागदपत्रे पाहताना या दोघांना मोडी लिपीमधील काही कागदपत्रे दिसून आली. 


त्यांचा अभ्यास करताना त्यांना छत्रपती शिवरायांची ही जुनी अप्रकाशित बखर सापडली. ही बखर चिमाजीअप्पांच्या सिद्दीवरील स्वारीनंतर म्हणजे अंदाजे १७४० नंतर लिहिली गेली असावी. बखरीच्या शेवटी 'ही किताबत राजश्री राघो मुकुंद याची असे.' असा उल्लेख आहे. त्यामुळे ही बखर आतापर्यंत मिळालेल्या सर्व एक्क्याण्णव कलमी बखरींचा पूर्वसुरी दस्तावेज आहे असे म्हणता येईल.

अशी सापडली बखर

'बीएनएफ' संग्रहालयाच्या सूचीनुसार युरोप खंडातील संस्कृत भाषेचे पहिले पंडित उजेन बर्नूफ याच्या संग्रहात संस्कृत आणि अन्य संकीर्ण विषयांशी संबंधित हस्तलिखिताचे ६८६, ६८७, ६८८ हे तीन खंड आहेत. टॉम हॅमिल्टन हे उजेन बर्नूफ याचे वडील जीन-लुई बर्नूफ यांचे गुरू होते. जीन-लुई यांना हा हस्तलिखित संग्रह टॉम हॅमिल्टन यांनी दिले असावे आणि या मार्गाने हा संग्रह उजेन बर्नूफ याच्या संग्रहात पोहोचला असावा. १८५४ साली बर्नूफ यांचा संग्रह 'बीएनएफ'ने खरेदी केला आणि त्यावेळीपासून ही हस्तलिखिते 'बीएनएफ' येथील बर्नूफ यांच्या संग्रहात आहेत. या हस्तलिखित संग्रहामध्ये ही अप्रकाशित बखर होती.

बखरीतील उल्लेख

छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्ण कारकीर्द आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीचा प्रारंभ या बखरीत आलेला आहे. महाराज व सईबाई यांच्यातील संवाद, बोरीची काठी महाराजांच्या पालखीला कशी आडकाठी करत होती? आणि तेथे खणल्यावर कसा द्रव्यलाभ झाला? अफझलखानाला मारले त्यावेळी कोण लोक हजर होते? विविध साधुसंतांच्या महाराजांनी घेतलेल्या भेटी असे अनेक बारीक तपशील बखरीमध्ये आहेत. छत्रपती संभाजी महाराज रायगडी आले त्यावेळी तिथे असलेले सामान त्यांनी ताब्यात घेतले, त्याची यादीही बखरकाराने बहुदा एखाद्या जुन्या अस्सल जमाखर्चाच्या आधाराने दिली असल्याचे कानिटकर यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांची एखादी बखर प्रकाशित होऊन अंदाजे 

साठ-सत्तर वर्षे उलटली आहेत. मराठी साम्राज्याची छोटी बखर त्याच्यातील थोडी हकिगत ह्या बखरीशी जुळते, तीही आज दुर्मिळ झाली आहे. या बखरीची माहिती सर्वांना व्हावी या उद्देशाने आम्ही दीडशे पानांचे पुस्तक प्रकाशित करीत आहोत. त्यात आम्हाला सापडलेली ८४ पानी मूळ मोडी बखर आणि त्याचे ४४ पानी देवनागरी लिप्यंतर, आवश्यक टीपा, परिशिष्टे आहेत. या बखरीतून शिवरायांचे जीवनचरित्र आणि त्यावेळच्या लोकजीवनाची माहिती सर्वांसमोर येणार आहे.