Sangli Samachar

The Janshakti News

संसदेत खासदारकीची शपथ घेतल्यानंतर सांगलीत फटाक्यांची आतषबाजी !



सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २६ जून २०२४
सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणून आलेले विशाल पाटील यांनी आज लोकसभेत कोणत्या भाषेतून शपथ घेतात याबद्दल सांगली जिल्ह्यात सर्वत्र उत्सुकता होते या पार्श्वभूमीवर खा. विशाल पाटील यांनी खासदारकीची हिंदी भाषेतून शपथ घेतली.

यावेळी लोकसभेत विशाल पाटील यांच्या मातोश्री श्रीमती शैलजाभाभी पाटील, माजी मंत्री व आमदार विश्वजित कदम, विशाल पाटील यांच्या पत्नी सौ. पुजा पाटील, श्रीमती जयश्रीताई पाटील, सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जितेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.


वसंतदादा कुटूंबातील खासदारकीची शपथ घेणारे विशाल पाटील हे सहावी व्यक्ती ठरले आहेत. यापुर्वी स्व. वसंतदादा पाटील, श्रीमती शालिनीताई पाटील, स्व. प्रकाशबापू पाटील, स्व. मदनभाऊ पाटील, प्रतिक पाटील यांनी शपथ घेतली होती.

खा. विशाल पाटील यांनी संसदेत शपथ घेतल्यानंतर सांगलीतील काँग्रेस कमिटी समोर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोश पूर्ण वातावरणात फटाक्यांची आतषबाजी केली. खा. विशाल दादांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.