| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. ११ जून २०२४
बालाजी साळुंखे हे गेल्या १३ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. शिक्षण घेत असताना एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे पाहिले आणि आपणसुद्धा असे पोलिस अधिकारी व्हावे, असे वाटले आणि पोलिस अधिकारी पदापर्यंत मजल मारली. फक्त, चांगले काम करत राहायचे, अशा विचारातून ते पुढे आले आहेत. श्री. साळुंखे यांच्याविषयी थोडक्यात…
बालाजी साळुंखे यांचे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील आरवडे हे गाव. आशिया खंडामध्ये द्राक्षे, तसेच बेदाण्यासाठी प्रसिद्ध असलेले गाव म्हणून आरवडे गावची ओळख. शेतकरी कुटुंबातील त्यांचा जन्म. कुटुंब शेतकरी असल्यामुळे घरामधील नोकरी कोणी केली नव्हतीच. पण, बालाजी साळुंखे यांच्या वडिलांनी मुलाचा कल हा शिक्षणाकडे असल्याचे पाहून त्यांच्या शिक्षणावर खर्च करण्याचे ठरवले. बीएसस्सीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षा दिली आणि उत्तीर्णही झाले. कुटुंबातील ते पहिले नोकरदार ठरले आहेत. दुसरीकडे पोलिस दलात दाखल झाल्यानंतर विविध गुन्हे उघडकीस आणले आहेत. शिवाय, शक्य तेवढ्या नागरिकांना मदत करत राहण्याचा स्वभाव आहे. कुटुंबातील कलहामुळे पती-पत्नी विभक्त होण्याच्या मार्गावर असताना त्यांनी दोघांना समजावून सांगत अनेक संसार सुरळीत केले आहेत. शिवाय, धडाकेबाज गुन्हेही उघड केले आहेत. जनसंपर्क आणि मित्रपरिवारही त्यांचा मोठा आहे.
बालपण…
बालाजी साळुंखे यांचे बालपण हे आरवडे गावात गेले. सधन शेतकरी कुटुंब. पण, बालाजी यांना शेतीमध्ये काम करण्यापेक्षा अभ्यासामध्येच पहिल्यापासून जास्त रस होता. शाळेत असताना अभ्यासात पहिल्यापासून हुशार. आई-वडिलांनी सुद्धा त्यांना शेतामधील फारसे काम कधी सांगितली नाहीत. शाळा आणि अभ्यास हा त्यांचा दिनक्रम असे. मुलाचा कल हा अभ्यासात असल्यामुळे शिक्षणावर हवा तेवढा खर्च करू पण नोकरीवर खर्च करणार नाही, असे वडिलांनी सांगितले होते. आरवडे गावामध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पुढे विसापूर येथे मामाच्या गावाला शिक्षणासाठी गेले आणि आयुष्याला कलाटणी मिळाली.
शिक्षण…
१ ते ४ – जिल्हा परिषद शाळा, आरवडे
५ ते १० – सिद्धनाथ हायस्कूल, आरवडे
११ ते पदवी – तासगाव, जि. सांगली
अधिकाऱ्यांचे गाव…
सांगली जिल्ह्यातील विसापूर हे खेडेगाव. पण, गावामध्ये तब्बल ३० पेक्षा जास्त अधिकारी आहेत. सीआयडी विभागाचे नामदेव चव्हाण हे गावातील पहिले पोलिस अधिकारी. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत अनेकांनी अधिकारी पदापर्यंत मजल मारली आणि अधिकाऱ्यांचे गाव म्हणून गावाची ओळख निर्माण झाली आहे. विसापूर हे बालाजी साळुंखे यांच्या मामाचे गाव. गावामध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते विसापूर येथे दाखल झाले होते. पोलिस उप महानिरीक्षक (DIG) नामदेव चव्हाण यांना प्रथम पाहिले आणि आपणदेखील पोलिस अधिकारी व्हावे, असे ठरवले. पुढे त्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आणि अधिकारी होऊन दाखवले.
खास मित्र: ज्यांचा सल्ला महत्त्वाचा ठरला
बालाजी साळुंखे यांचे अजित आंबी हे खास मित्र. सध्या ते सहा. पालिका आयुक्त, बृहन्मुंबई मनपा म्हणून कार्यरत आहेत. मित्राने स्पर्धा परीक्षा देण्याचा सल्ला दिला आणि वेळोवेळी मार्गदर्शनही केले. बालाजी साळुंखे यांनी डीवायएसपी व्हायचे ठरवले होते. त्या दृष्टिकोनातून अभ्यासही सुरू होता. तासगाव येथून २००३ साठी राज्यसेवा पूर्वपरीक्षा दिली आणि उत्तीर्णही झाले. पुढे राहुरीमधून मुख्य परीक्षा दिली. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी २००५ मध्ये पुणे शहरात दाखल झाले. मावसभावासोबत राहून अभ्यास करू लागले. पहिल्या प्रयत्नात अपयश आले. पण, दुसऱ्यांदा स्पर्धा परीक्षा दिली आणि २००८ साठी उत्तीर्ण झाले. पोलिस उपनिरीक्षक म्हणून अधिकारी झाले होते. पण, आपण केवळ मित्रामुळे पोलिस अधिकारी झालो आहोत, असे बालाजी साळुंखे सांगतात.
पोलिस दलातील कार्यकाळ…
२०१० – नाशिक प्रशिक्षण
२०११ ते २०१४ – मालवणी, मलबार पोलिस स्टेशन (मुंबई शहर)
२०१५ ते २०१७ – विशेष सुरक्षा विभाग, पुणे
२०१८ ते २०१९ – स्वारगेट पोलिस स्टेशन, पुणे
२०२० ते २०२२ – सिंहगड रोड पोलिस स्टेशन, पुणे
२०२२ ते २०२३ – वाचक, पोलिस सहआयुक्त, पुणे
सध्या हांडेवाडी येथे वाहूतक विभागाची जबाबदारी.
प्रेमप्रकरण आणि अपहरण…
बालाजी साळुंखे यांनी नाशिक येथील प्रशिक्षणानंतर चार वर्षे मुंबई पोलिस दलात काम केले आहे. मुंबईमध्ये काम करत असताना खूप काही शिकायला मिळाले. मुंबईमध्ये पाया मजबूत झाल्यामुळे पुढे काम करताना सोपे झाले होते. पोलिस दलात काम करत असताना एक ना अनेक गुन्हे उघड केले आहेत. पण, काही गुन्हे हे नेहमीच लक्षात राहतात. त्यापैकी एक म्हणजे प्रेमप्रकरण आणि त्यामधून झालेले अपहरण. संबंधित गुन्हा त्यांनी उघड केला असून, युवकाला जीवदान मिळवून दिले आहे. संबंधित गुन्ह्याविषयी ते सांगतात…
सिंहगड रोड पोलिस स्टेशन येथे कार्यरत असताना प्रेमप्रकरणातून एका युवकाचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल झाली होती. संबंधित गुन्ह्याचा तपास श्री. साळुंखे यांच्याकडे देण्यात आला होता. मुलगी गरीब कुटुंबातील, तर मुलगा श्रीमंत कुटुंबातील होता. दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. पण, मुलीच्या नातेवाइकांना हा विवाह मान्य नव्हता. मुलीच्या तीन नातेवाइकांनी मुलाचे अपहण केले होते. त्यांच्याकडे तलवारी आणि पिस्तूल असल्याची माहिती तक्रारीमध्ये देण्यात आली होती. मुलाच्या जिवाला धोका होता. तक्रार दाखल झाल्यानंतर श्री. साळुंखे यांनी तत्काळ तपास सुरू केला.
युवकाचे अपहरण केलेली मोटार कोणत्या दिशने गेली आहे, याबाबतची सीसीटीव्हीद्वारे माहिती काढली. लोकेशन ट्रॅक करणे सुरू केले. पोलिस दलातील अनेक अधिकारी मित्र असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधून मोटारीबाबत माहिती देऊ-घेऊ लागले. अपहरण करणाऱ्या मोटारीच्या दिशेने पोलिसांची मोटार निघाली होती. श्री. साळुंखे पोलिस स्टेशनला थांबून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. शिवाय, पुढे काय करायचे याचे नियोजन करत होते. सहकाऱ्यांना सूचना देत होते. कारण, युवकाच्या जिवाला धोका होता. थोडा वेळ जरी वाया घालवला तरी जीव जाऊ शकतो, हे माहीत असल्यामुळे योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे होते.
(पोलीसकाका वरुन साभार)
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ऑनलाइन पुस्तक खरेदी करा…
पुस्तकाचे नाव - पोलिसकाका