| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ५ जून २०२४
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे कल आता स्पष्ट व्हायला सुरूवात झाली आहे. या कलांनुसार भाजपला मोठा धक्का बसताना दिसत आहे. 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला बहुमताचा आकडा गाठणंही कठीण होऊन बसलं आहे. संध्याकाळपर्यंत कल पाहिले तर भाजप 238 जागांवर आघाडीवर आहे, तर एनडीएची मिळून 291 जागांची आघाडी झाली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला 92 जागांवर आघाडी मिळाली आहे. इंडिया आघाडी मिळून 231 जागांवर पुढे आहे.
भाजप बहुमतापासून दूर असल्यामुळे आता काँग्रेसकडून मोठा डाव टाकण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. काँग्रेस पक्ष टीडीपी आणि नितीश कुमार या दोघांशीही चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय इंडिया आघाडीचे काही खासदार सत्ता स्थापनेसाठी कमी पडले, तर त्यांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी शरद पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्यावर येऊ शकते. 30 खासदार कमी पडले तर त्या पक्षांसोबत बोलण्याची जबाबदारी शरद पवार घेऊ शकतात, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.
बिहारमध्ये एकूण 40 जागांपैकी 15 जागांवर नितीश कुमारांची जेडीयू आघाडीवर आहे तर भाजपला 11 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर चंद्रबाबू नायडू यांची टीडीपी 16 जागांवर आघाडीवर आहे. जेडीयू आणि टीडीपी हे दोन्ही पक्ष सध्या एनडीएसोबत आहेत. या दोन्ही पक्षांना इंडिया आघाडीत आणण्यासाठी काँग्रेस आणि शरद पवारांकडून प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.