| सांगली समाचार वृत्त |
कोल्हापूर - दि. ११ जून २०२४
रोज मरे त्याला कोण रडे अशी परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यातील सीमा भागात राहणाऱ्या प्रवाशांची झाली आहे. विशेषतः चंदगड आणि आजरा तालुक्यांतील प्रवाशाचे मोठे हाल नेहमीच होत असतात. या प्रवाशांचा असंतोषाचा बांध आज फुटला. सायंकाळी नियोजित सात वाजताची बस कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक मधून रद्द करण्यात आली, त्यानंतर संतप्त प्रवाशांनी एक तासाहून अधिक काळ बस स्थानकाचे गेट अडवून धरत आंदोलन केले.
त्यानंतर शाहूपुरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी विभाग नियंत्रक आणि प्रवाशांची चर्चा घडवून चंदगडसाठी तातडीने तीन बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे प्रवाशी काहीसे शांत झाले, पण चंदगड आणि सीमा भागातील नागरिकांसाठी कायमस्वरूपी बसेस सोडण्यात यावेत अशी मागणी प्रवाशांनी केली.
चंदगड भागातील प्रवाशांचे रोजचेच हाल
कोल्हापूर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे तालुक्याच्या ठिकाणावरून प्रवासी रोज ये - जा करतात. चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज या तीन तालुक्यातील प्रवासी देखील मोठ्या प्रमाणात कोल्हापूर शहरात प्रशासकीय वैद्यकीय आणि इतर कामांसाठी येतात. कोल्हापूरला येण्यासाठी कमी प्रमाणात का असेना सकाळी लवकर बसेस आहेत. पण सायंकाळी मात्र चंदगड भागात परत जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे.
असं असताना कोल्हापूर बस स्थानक परिसरातून सायंकाळी 6 आणि 7 वाजता चंदगड साठी दोन बसेस सोडल्या जातात. पण या दोन बसेस देखील कधी रद्द होतील याचा काही नेम नाही. त्यामुळेच या प्रवाशांचे मोठे हाल अनेक वेळेला झालेले आहेत. कोल्हापूरहून चंदगडला जाण्यासाठी चार ते साडेचार तासाचा कालावधी लागतो, सायंकाळी सातची बस मिळाली तर चंदगडला पोहोचण्यासाठी रात्रीचे अकरा - साडेअकरा होतात. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते.
चंदगडकरांची नेमकी मागणी काय ?
जिल्ह्याच्या ठिकाणाला जाण्यासाठी सकाळी अतिरिक्त बसेस सोडाव्यात आणि त्याचबरोबर सायंकाळी चंदगडला परत येण्यासाठी अतिरिक्त त्याचबरोबर विना थांबा बस द्याव्यात अशी मागणी चंदगडकरांची गेल्या अनेक वर्षापासून आहे.