| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २१ जून २०२४
सांगली लोकसभा निवडणुकीतील वादावादीचा धुरळा खाली बसत नाही, तोपर्यंतच सांगली विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने "तू तू - मैं मैं" सुरू झाल्यामुळे भाजप आणि काँग्रेस पक्षांच्या नेत्यांसमोर या निवडणुकीतील मतांच्या गणिताचा पेपर अवघड जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
सध्या तरी भाजपमधून विद्यमान आमदार सुधीर दादा गाडगीळ यांचे एकमेव नाव समोर येत आहे. परंतु त्यांच्या विरोधातही संजय काका पाटील यांच्याप्रमाणेच पक्षांतर्गत नाराजी असल्याचे बोलले जाते. याशिवाय त्यांच्यासमोर काँग्रेसचे तगडे आव्हान उभे असणार आहे. काँग्रेस मधूनच स्व. मदन भाऊ पाटील यांचे कार्यकर्ते सध्या जयश्रीताई पाटील यांच्यासाठी आक्रमक असून, सुधीरदादा प्रमाणेच, पृथ्वीराज बाबा पाटील यांच्यासाठी ही 'धोक्याची घंटा' ठरू शकते.
स्वतः जयश्रीताईंनी उघडरित्या काही प्रतिक्रिया दिली नसली तरी त्यांची अपेक्षा लपून राहिलेली नाही. लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे विशाल दादांची निवडणूक त्यांच्या कार्यकर्त्यांनी हातात घेतली. त्याप्रमाणे मदन भाऊंचे कार्यकर्ते विधानसभेची निवडणूक आपल्या हातात घेतात की काय ? अशी शंका व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जयश्रीताईंनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव वेगळी भूमिका घ्यायची ठरवले तर काय ? हा गंभीर प्रश्न सुधीर दादा गाडगीळ आणि पृथ्वीराज बाबा पाटील यांच्यासमोर उभा राहणार आहे.
सुधीरदादा गाडगीळ यांना भाजपाने उमेदवारी दिली, तर त्यांची हॅट्रिकसाठी तयारी असणार आहे. गेल्या दोन निवडणुकीत त्यांच्या पाठीशी असणारी भाजप व्यतिरिक्त 'करेक्ट कार्यक्रमाची' शक्ती यावेळेस कितपत ताकतवान ठरते ? हा प्रश्नच आहे. कारण या 'करेक्ट कार्यक्रमाची' ताकद राज्याच्या 'दादांनी' कमी केली आहे. त्यामुळे सुधीरदादांना हॅट्रिक साधायचे असेल, तर गेल्या दहा वर्षात त्यांनी केलेल्या 'विकास कामाचे मेरिट कार्ड' आणि संघशक्ती हीच शक्तिशाली ठरणार आहे.
गतनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज बाबा पाटील यांच्यावर विजयाचा गुलाल थोडक्या मतांनी हुकला होता. परंतु खचून न जाता त्यांनी गेल्या पाच वर्षात तरुणांचे मोठे संघटन उभे केले आहे. याशिवाय विविध आंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत त्याने उठवलेला आवाज आणि राम मंदिर निर्माणाच्या पार्श्वभूमीवर उभारलेले प्रति राम मंदिर आणि विविध हिंदू सणांच्या माध्यमातून आयोजलेल्या कार्यक्रमांमुळे पृथ्वीराज बाबांच्या पाठीमागे हिंदू मतांचा टक्का वाढलेला दिसून येतो. त्याचप्रमाणे पारंपारिक मुस्लिम मतांची वोट बँक त्यांना विजयासमीप घेऊन जाण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे.
सुधीर दादा गाडगीळ व पृथ्वीराज पाटील या तुल्यबळ उमेदवारांसाठी अन्य उमेदवार कितपत आव्हान उभे करतात ? आणि ते कोणाची मते खातात यावर विजयाचा गुलाल कोणाच्या अंगावर उधळला जाणार हे ठरणार आहे. तोपर्यंत विधानसभेच्या मैदानात उतरणाऱ्या पैलवानांमध्ये खडाखडीचा डाव राहणार हे नक्की !