yuva MAharashtra रिक्षा संघटना महासंघाचा 'आरटीओ' वर धडक माेर्चा; फिटनेस विलंबासाठीचे अतिरिक्त शुल्क रद्द करण्याची मागणी !

रिक्षा संघटना महासंघाचा 'आरटीओ' वर धडक माेर्चा; फिटनेस विलंबासाठीचे अतिरिक्त शुल्क रद्द करण्याची मागणी !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १४ जून २०२४
पंधरा वर्षाच्या आतील ऑटो रिक्षाच्या फिटनेस विलंबासाठी प्रतिदिन लावलेले ५० रूपये अतिरिक्त शुल्क रद्द करावे या मागणीसाठी ऑटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघाच्यावतीने सांगलीत आरटीओ कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तत्काळ हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

ऑटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघाचे अध्यक्ष महेश चौगुले आणि पदाधिकारी यांनी रिक्षासह गुरूवारी आरटीओ कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला. 'फिटनेस विलंब शुल्क आकारणी रद्द झालीच पाहिजे', 'जुलमी दंड रद्द झालाच पाहिजे', 'दंड वसूल करायचा असेल तर आम्हाला रोजगार द्या' अशा जोरदार घोषणांनी आरटीओ कार्यालय परिसर दणाणून सोडला. तसेच सरकारच्या विरोधात निदर्शने केली.


प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत साळी यांना महासंघाच्या पदाधिकारी यांनी निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, केंद्रिय सडक परिवहन व राज्यमार्ग मंत्रालयाने २९ डिसेंबर २०१६ रोजी रिक्षा नूतनीकरण विलंबासाठी प्रतिदिन ५० रूपये दंडाची अधिसूचना जारी केली. त्याला मुंबई बस मालक संघटनेने उच्च न्यायालयात आव्हान दिले. तेव्हा २०१७ व २०२२ च्या याचिकांची एकत्रित सुनावणी घेऊन त्या खारीज केल्या. याचा आधार घोषित ७ मे २०२४ पासून परिवहन विभाग मुंबई यांनी फिटनेस विलंब शुल्क आकारण्यास प्रारंभ केला. मात्र तत्पूर्वी २०१९ आणि ४ ऑक्टोंबर २०२१ मध्ये मंत्रालयाने नवीन अधिसूचना काढली आहे. त्यामुळे मागील परिपत्रकाचे किंमत शून्य होते. त्यामुळे फिटनेस विलंब शुल्क आकारणी रद्द करावी अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला.

महासंघाचे कोषाध्यक्ष राजेश रसाळ, राज्य सदस्य रफिक खतीब, फारूख मकानदार, रफिक जमादार, सलिम मलिदवाले, जावेद पटवेगार, मोहसीन पठाण, प्रकाश चव्हाण, सुखदेव कोळी, संतोष ठोंबरे, तानाजी फडतरे, बंडू तोडकर, महेश सातवेकर आदींसह सांगली-मिरजेतील रिक्षा चालक उपस्थित होते.