Sangli Samachar

The Janshakti News

अखेर सांगली, कुपवाडमधील नागरिकांची गटारगंगेपासून सुटका !


सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ जून २०२४
सांगली शहरात शेरीनाल्याच्या 80 एमएलडी पाण्याची गंटारगंगा दररोज कृष्णा नदीत मिसळत असल्याने सांगली व कुपवाड शहरातील नागरिकांना पाणी नव्हे; तर विष पचवावे लागत आहे. शहराला नव्याने 94 कोटींची शेरीनाला योजना मंजूर झाली आहे. त्यामुळे शहरातील सर्व सांडपाण्याचे शुद्धीकरण होणार आहे. तर नव्याने सांडपाणी शुद्धीकरणासाठी एसटीपी (सांडपाणी प्रकिया सयंत्र) प्रकल्प होणार आहे. त्यामुळे सांडपाण्याचा प्रश्न निकाली लागणार आहे.

सांगली महापालिकेच्या शेरीनाल्याचा प्रश्न राज्यभर गाजला होता. शेरीनाला आणि सांगलीचे राजकारण गेल्या चार दशकांचे आहे. राजकारणाच्या केंद्रस्थानी शेरीनाल्याचा मुद्दा मांडला जात होता. कुपवाडच्या सावळी हद्दीपासून वाहणाऱ्या नाल्यातून दररोज शेकडो लीटर सांडपाणी थेट कृष्णा नदीत मिसळत होते. त्यामुळे कृष्णा नदी प्रदूषित होत होती. 1998 साली केंद्रात अटलबिहारी वायपेयी यांच्या काळात केंद्रीय पर्यावरणमंत्री सुरेश प्रभू यांनी राष्ट्रीय नदी कृती योजना राबवली. या अंतर्गत 2001 मध्ये धुळगाव शेरीनाला योजनेला मान्यता मिळाली. कृष्णा काठावर शेरीनाला अडवून पंपिंगद्वारे ते धुळगावपर्यंत नेणे व तेथे ऑक्सिडेशन पॉण्डमध्ये ते शुद्ध करून शेतीला पाणी देण्याची ही योजना होती. पूर्वीची 22 कोटींची असणारी योजना 32 कोटींवर गेली. शेरीनाल्यावरील पंपगृह, कवलापूर येथील पंपगृह, धूळगावपर्यंतची 18 किलोमीटरची वाहिनी, धूळगाव येथे ऑक्सिडेशन पौंड ही कामे पूर्ण झाली. तरीही कृष्णा नदीचे प्रदूषण थांबलेले नाही. शेरीनाल्यावर पंप बंद असतात, अथवा त्यात बिघाड झालेला असतो. त्यामुळे सांडपाणी थेट नदीत मिसळते. धुळगाव येथे शेतीच्या बांधापर्यंत पाणी पोहोचलेले नाही. प्रकल्पातील काही कामे अद्याप अपूर्ण आहेत. धुळगावच्या शेतकऱ्यांनी वितरण व्यवस्थेसह इतर काही बदल योजनेत सूचविले होते. मात्र, त्याला शासनाकडून निधी मिळाला नाही. त्यामुळे या योजनेचे पंप कधी सुरू, तर कधी बंद असतात.

एसटीपी प्रकल्पाच्या जागेचा प्रश्न सुटला

धुळगाव शेरीनाला योजनेत जमा होणारे पाणी व नव्याने येणाऱ्या पाण्यावर शुद्धीकरण करून हे पाणी धुळगावला पाठविण्यात येणार आहे. धुळगावकरांना पाण्याची गरज नसल्यास हे पाणी कृष्णा नदीपात्रात सोडले जाणार आहे. सांगलीवाडी व सांगलीत एसटीपी उभारण्यासाठी जागेची अडचण निर्माण झाली होती. मात्र, हा प्रश्न मिटला असून, शासनाकडे प्रस्तावदेखील पाठविला आहेत. शासनाकडून याला जूनअखेरीस मान्यता मिळणार आहे. त्यामुळे शहरातील 80 एमएलडी सांडपाण्याचा प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे.

कुपवाडच्या सांडपाण्यावर प्रक्रिया होणार

कुपवाड ड्रेनेज योजनेला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे कुपवाड व परिसरातील सांडपाणी शेरीनाल्याकडे येणार नाही. त्या सांडपाण्यावर कुंभारमळा येथे प्रक्रिया होणार आहे. शुद्ध केलेले पाणी पुढे ओढ्यातून सोडले जाणार आहे. हनुमाननगर येथील ऑक्सेडेशन पॉण्ड 23 एमएलडी क्षमतेचे आहे. सध्या साडेबारा एमएलडी क्षमतेने सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्या ठिकाणीही पूर्ण क्षमतेने प्रक्रिया केली जाणार आहे.

नवीन योजनेत काय असणार

जुन्या शेरीनाला योजनेत नवीन एसटीपी (सांडपाणी प्रकिया सयंत्र) ट्रक टर्मिनलच्या जागेत 22 एमएलडी नवीन एसटीपी सांगलीवाडी येथे 3 एमएलडी नवीन एसटीपी जे. जे. मारुती येथील पाणी पंपिंग करून शेरीनाल्याकडे सर्व पाणी शुद्धीकरण करून धुळगावला पाठवणार.

शेरीनाल्यावर 94 कोटींचा प्रकल्प

महापालिकेने आता सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी धूळगाव शेरीनाल्याच्या प्रकल्पाजवळ नव्याने एसटीपी बसविण्यात येणार आहे. तर, ट्रक टर्मिनलच्या ठिकाणी 22 एमएलडी सांडपाणी प्रकल्प उभा करण्यात येणार आहे. पूररेषेच्या वर हा प्रकल्प करण्यात येणार आहे. शिवाय सांगलीवाडी येथे तीन एमएलडीचा एसटीपी प्रकल्प देखील उभारण्यात येणार आहे. शिवाय जे. जे. मारुती येथे पंप बांधून ते पाणी शेरीनाल्यापर्यंत आणण्यात येणार आहे. त्या ठिकाणी पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी 94 कोटींचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.