सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २९ जून २०२४
छत्रपती शिवाजी महाराज आणि इतकेच, छत्रपती संभाजी महाराजांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग संपूर्ण महाराष्ट्रात आढळून येतो. विशेषतः सांगली जिल्ह्यात संभाजीराव भिडे गुरुजी यांनी शिव प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवकांचे जे संघटन उभे केले आहे, अशा लाखो शिवप्रेमींच्या हृदयात छत्रपती शिवाजी महाराजां इतकेच छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल स्फुल्लिंग जागृत केले आहे
आणि म्हणूनच सांगली जिल्ह्यात 'बलिदान दिवस' साजरा करून छत्रपती संभाजी महाराजांचे विशेष मरण केले जाते. या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून 'धर्म ज्योत' प्रज्वलित करून गावोगावी नेल्या जातात.
छत्रपती संभाजी महाराजांचा कार्यकाल अल्प असला तरी त्यांनी गाजवलेला शूर पराक्रम सह्याद्री इतका विशाल म्हणायलाच हवा. त्याचप्रमाणे याच सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या शिराळा नगरीचा आणि संभाजी महाराजांचा खूप जिव्हाळ्याचा संबंध आहे. आणि म्हणूनच शिराळा येथील तोरणा भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळ्यासह भव्य स्मृतिस्थळ उभारण्याची मागणी शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी, सातत्याने लावून धरली होती. या कामासाठी २५ कोटी रुपये खर्च येणार असून त्यापैकी १३.४६ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पात केली आहे.
इतिहासात मोगल सैन्य छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे कैद करून बहाद्दूर गडाकडे घेऊन जात असताना शिराळा येथे त्यांच्या सुटकेचा प्रयत्न झाला होता. भुईकोट किल्ला परिसरात महाराजांना सोडविण्यासाठी संघर्ष झाला. सरदार जोत्याजी केसरकर, सरदार आप्पासाहेब शास्त्री- दीक्षित, तुळाजी देशमुख, हरबा वडार व त्यांच्या सोबत असलेल्या ४०० मावळ्यांनी मोगलांशी संघर्ष केला. पण ते अयशस्वी ठरले. या संघर्षाची नोंद इतिहासात आहे. शिराळ्याच्या इतिहासासाठी हे सुवर्ण पान मानले जाते.
हा अभिमानास्पद समरप्रसंग पुढचील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरावी व त्याच्या स्मृती चिरंतन जपल्या जाव्यात यासाठी स्मृतीस्थळाची मागणी होत होती. अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व स्मृतिस्थळ उभारले जाणार आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचे अभिमानास्पद समरप्रसंग पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरावी व त्याच्या स्मृती चिरंतन जपल्या जाव्यात यासाठी स्मृतीस्थळाची मागणी होत होती. अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व स्मृतिस्थळ उभारले जाणार आहे. त्यासाठी १३.४६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी महाराजप्रेमी लाखो तरुणांमध्ये महायुती सरकारबद्दल आपुलकीची भावना निर्माण झाल्यास नवन वाटायला नको.
या स्मृतीस्थळाबद्दल माहिती देताना आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, संभाजी महाराजांच्या स्मृतिस्थळामध्ये अनेक ऐतिहासिक घडामोडींचा समावेश असेल. भिंतीवरील शिल्पे, छत्रपती संभाजी महाराज अश्वारूढ पुतळा, किल्ल्याची तटबंदी, कोटेश्वर मंदिर, तुळजाभवानी मंदिर यांची दुरुस्ती व जीर्णोद्धार करणे, धारातीर्थी पडलेल्या वीरांची समाधी यांची उभारणी होईल. सर्व बांधकामांना ऐतिहासिक झालर असेल. पर्यटनासाठीही ही पर्वणी ठरणार आहे. उर्वरित निधी मागणीनुसार उपलब्ध होणार आहे.