| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. ११ जून २०२४
नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांची अडवणूक करून त्यांच्याकडून चिरीमिरी उकळणाऱ्या वाहतूक पोलिसांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. यापुढे जर नागरिकांकडून पैसे घेताना वाहतूक पोलीस आढळून आले तर त्यांच्यावर थेट खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली.
वाहतूक पोलिसांवर सध्या कामाचा मोठा ताण आहे. शहरामधील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनलेली आहे. वाहतूक पोलिसांवर अनेकदा टीका देखील केली जाते. वाहतूक कोंडी होत असताना अनेकदा वाहतूक पोलीस कर्मचारी गाड्या उचलण्यामध्ये किंवा वाहन चालकांना अडवून त्यांच्याकडून दंड वसुली करण्यामध्ये मग्न असल्याचे दिसतात. अनेकदा चौकात आणि रस्त्यांवर उभे राहण्याऐवजी वाहतूक पोलीस आडबाजूला छुप्या पद्धतीने उभे राहतात. चार-पाच जणांच्या गठ्ठयाने एकदम वाहन चालकांच्या अंगावर जातात आणि त्यांच्यावर वेगवेगळ्या कलमाखाली दंडात्मक कारवाई करायला सुरुवात करतात. घाबरलेल्या वाहन चालकांकडून मोठ्या दंडाची रक्कम ऐकून त्यांच्याकडे विनवणी सुरू केली जाते.
त्यावेळी वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांकडे पैशांची मागणी केली जाते. चिरीमिरी घेऊन वाहन चालकांना सोडून दिले जाते. अनेकदा असेही प्रसंग घडतात की चालककडून पैसे घेतलेत आणि त्याच्यावर दंड ही आकारण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांकडून अशा प्रकारे चिरीमिरी घेण्याचे अनेक व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झालेले आहेत. या घटनांची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
कशी केली जाणार कारवाई ?
पोलीस आयुक्तांनी या कारवाईकरिता काही कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. हे पोलीस कर्मचारी साध्या नागरी वेशामध्ये वाहन चालक म्हणून शहराच्या विविध भागात फिरणार आहेत. वाहतूक पोलीस नागरिकांवर कारवाई करताना चिरीमिरी घेतात का? त्यांच्याकडे पैशांची मागणी करतात का? याची या पथकाकडून पाहणी केली जाणार आहे. असा गैरप्रकार आढळून आल्यानंतर तात्काळ खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
सांगली पोलीस आयुक्त कारवाई करणार का ?
सांगली शहरातही अनेक चौकात असे प्रकार उघडपणे घडत असल्याचे नागरिकांच्या नजरेत आले आहे. विशेषतः राजवाडा चौक, पुष्पराज चौक, मार्केट यार्ड, विश्रामबाग चौक, सिव्हिल हॉस्पिटल चौक, दत्तमारुतीरोड चौक इत्यादी महत्त्वाच्या चौकात, विशेषतः ज्या ठिकाणी वनवे संपतो अशा ठिकाणी वाहतूक पोलीस हातात दंडाची पावती बुक व मोबाईलवर वाहतूक नियमाचे भंग केलेल्या वाहनांचे फोटो टिपण्यात व त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात मग्न असतात. या दंडवसुलीच्या कार्यात हे वाहतूक पोलीस इतके दंग असतात की अनेक चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे यांचे लक्षच असत नाही. या दंड वसुलीसाठी महत्त्वाच्या चौकात दोन दोन तीन वाहतूक पोलीस असल्याचे पहावयास मिळते. त्यामुळे इतर अनेक महत्त्वाच्या चौकात या वाहतूक पोलिसांची गरज असूनही हे चौक नेहमीच वाहतूक कोंडीत अडकलेले पाहावयास मिळतात. त्यामुळे सांगलीतही अशा खंडणी बहाद्दर वाहतूक पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी सांगलीकर नागरिकांतून होत आहे.