Sangli Samachar

The Janshakti News

लोकसभेचा निकाल लागताच अजित पवारांच्या अडचणी वाढल्या !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १४ जून २०२४
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगिरीबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपने अजित पवारांना सोबत घेतल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाराज असल्याचेही समोर आले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत भाजप काडीमोड घेणार, या चर्चेलाही तोंड फुटले आहे. अशात सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी अजित पवारांच्या प्रकरणात थेट कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे अजित पवार अडचणीत येणार असल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अजित पवारांना क्लिनचीट दिली. आर्थिक गुन्हे शाखेने सी समरी रिपोर्ट कोर्टात सादर केलेला आहे. त्यावरच आता अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतला आहे.


महायुतीला धसका! विधानसभेआधी जरांगेंचा क्लिअर 'मेसेज' 

अण्णा हजारे अजित पवारांविरोधात कोर्टात

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी त्यांचे वकील माणिकराव जाधव यांच्या मार्फत मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने सादर केलेल्या पुरवणी क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेतला आहे. न्यायालयाने आक्षेप मान्य केला असून, याचिका दाखल करण्यास वेळ दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ जून रोजी होणार आहे. 

अण्णा हजारे यांच्या आक्षेपाच्या 'टायमिंग'बद्दल शंका

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे मार्चमध्ये अजित पवारांना क्लिनचीट देण्यासंदर्भातील अहवाल कोर्टात सादर केला होता. त्यावर अण्णा हजारे भूमिका घेताना दिसले नाहीत. पण, निकाल लागल्यानंतर त्यांनी थेट कोर्टात आक्षेप घेतला.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला जबर फटका बसला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे नाराज असल्याची चर्चा जाहीरपणे होऊ लागली आहे. अजित पवार यांना भाजप दूर करू शकते, अशीही चर्चा सुरू झाली असून, त्यातच अण्णा हजारेंनी पोलिसांच्या रिपोर्टवर आक्षेप घेतला आहे. या सगळ्या घटनांचा सबंध जोडत अण्णा हजारेंच्या भूमिकेबद्दल दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.