| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० जून २०२४
माधवनगर पासून विट्यापर्यंत किंबहुना उत्तरेकडील जिल्ह्यांना सांगलीशी जोडणारा मार्ग म्हणून सांगली विटा केला जातो. मिरज पुणे रेल्वे दुहेरीकरणासाठी सांगलीतील चिंतामणी नगर रेल्वे उड्डाणपूल गेल्या 10 जून रोजी जमीनदोस्त करण्यात आला. या उड्डाणपुलाचे काम कंत्राटदाराने 30 जानेवारी पूर्वी पूर्ण करणे गरजेचे होते. परंतु 10 जून उलटली तरी या पुलाचे काम अर्धवट आहे.
चिंतामणी नगर रेल्वे पूल अपूर्ण राहिल्यामुळे या मार्गावरील वाहतूक जुना बुधगाव रोड आणि संजय नगर मार्गे वळविण्यात आली आहे. विशेषतः जुना बुधगाव रोड रेल्वे गेट जवळ होणारी वाहन कोंडी नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. याची दखल घेऊन सांगली नागरिक कृती हक्क समितीतर्फे आणि उत्तरेकडील अनेक गावांतील नागरिकांच्या उपस्थितीत चिंतामणी नगर उड्डाणपुलाचे वर्ष श्राद्ध घालण्यात आले. यावेळी उपस्थितांना शिरा भाताचा नैवेद्यही देण्यात आला.
यावेळी बोलताना सतीश साखरकर म्हणाले की, या महत्त्वाच्या मार्गावरील उड्डाणपूल जानेवारी पूर्वी होणे आवश्यक होते. गेली सहा महिने याबाबत रेल्वे प्रशासन आणि कंत्राटदार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. प्रत्येक वेळी आम्हाला पूल वेळेत पूर्ण होईल, असे आश्वासन देण्यात आले. परंतु आज अखेर पुलाचे काम पूर्ण झाले नाही. येत्या महिन्याभरात जर पूल वाहतुकीसाठी खुला झाला नाही, तर रेल रोको आणि रास्ता रोको यासह आंदोलन तीव्र करण्यात येईल. आणि याचे संपूर्ण जबाबदारी रेल्वे व स्थानिक प्रशासनाचे राहील. असा इशारा साखरकर यांनी दिला आहे.