| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ जून २०२४
राज्यातील लोकसभा निवडणुकांचे निकाल अवघ्या काही तासांवर आलेत. महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरुन सर्वाधिक चर्चेत आलेल्या सांगली लोकसभेच्या तिरंगी लढतीत खासदार कोण होणार ? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. एक्झिट पोलमध्ये काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील बाजी मारत असल्याचे दिसत होते. यावर आता विशाल पाटील यांनीही महत्वाचे विधान केले आहे.
काय म्हणाले विशाल पाटील?
"ही जनतेची निवडणूक होती. त्यामुळे एक्झिट पोल माझ्या बाजूने दाखवला गेला. खऱ्या अर्थाने जनतेने ठरवले होते. आणि बदल होणार असे दिसत आहे. वसंतदादा यांचा नातू पडावा त्यासाठी प्रयत्न केले गेले. पण सांगलीला अहंकार जास्त चालत नाही," असा टोला यावेळी विशाल पाटील यांनी लगावला.
"मी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे आणि सांगली काँग्रेसचे हे बंड आहे. उद्या निकालानंतर लवकरात लवकर घटक पक्ष मला स्विकारतील असे माझे मत आहे. माझ्या विमानाच्या पायलटांनी दिशा ठरवली. त्यामुळे हे शक्य झाले. निकाल लागल्यानंतर आमच्या वरिष्ठांशी बोलेन आणि निर्णय घेईन. मी महाविकास आघाडीचाच उमेदवार आहे. उद्याचा निकाल आपल्यासाठी चांगलाच आहे, मोठ्या फरकाने मी निवडून येईल.. असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला.
दरम्यान, सांगली लोकसभा मतदार संघात महायुतीकडून संजयकाका पाटील, महाविकास आघाडी पुरस्कृत ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यामध्ये लढत झाली. दोन दिवसांपूर्वी समोर आलेल्या एक्झिट पोलने विशाल पाटील यांच्या बाजूने कल दिला आहे. मात्र आता सांगलीचा खासदार कोण? याचा अंतिम फैसला काही तासांमध्ये लागणार आहे.