yuva MAharashtra काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेतेपदी सोनिया गांधीच; पण लोकसभा विरोधी पक्ष नेतेपद निर्णयाविनाच !

काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेतेपदी सोनिया गांधीच; पण लोकसभा विरोधी पक्ष नेतेपद निर्णयाविनाच !



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ९ जून २०२४
काँग्रेस पार्लमेंटरी पार्टी म्हणजेच काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेतेपदी काँग्रेस नेत्यांनी आज सोनिया गांधी यांचीच निवड केली. पण लोकसभेतल्या विरोधी पक्षनेते पदासाठी राहुल गांधींचे नाव दिले असले तरी प्रत्यक्षात त्यांनी ती जबाबदारी स्वीकारायला अजून तरी तयारी दर्शवली नाही. 

आज सकाळी काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत संपूर्ण काँग्रेस कार्यकारिणीने राहुल गांधींनी लोकसभेतले विरोधी पक्ष नेते पद स्वीकारावे, असा ठराव एकमताने मंजूर केला. परंतु, त्यावर आपण विचारपूर्वक निर्णय घेऊन पक्षाला कळवू एवढेच संक्षिप्त उत्तर देऊन राहुल गांधींनी पुढचा विषय टाळला.

सायंकाळी जुन्या संसद भवनाच्या केंद्रीय सभागृहात काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक झाली त्याचे लोकसभा आणि राज्यसभेतले सगळे खासदार उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेतेपदी सोनिया गांधींच्या नावाचा प्रस्ताव मांडला. तो काँग्रेसच्या सर्व खासदारांनी एकमुखाने मंजूर केला. त्यामुळे सोनिया गांधींची काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेतेपदी फेरनिवड झाली. मात्र काँग्रेस पक्षाच्या लोकसभेतल्या नेतेपदी राहुल गांधींची निवड करणे संसदीय पक्षाने टाळले.


सोनिया गांधी राज्यसभेमध्ये आहेत. त्यामुळे त्या सभागृहामध्ये पक्षाचे नेतृत्व करू शकतात. त्याचबरोबर सोनिया गांधी या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहासाठी काँग्रेस पक्षाच्या नेतेपदी अन्य कोणाचीही निवड करू शकतात. काँग्रेस पक्षाच्या लोकसभेतला नेता संख्याबळाच्या आधारे लोकसभेतला विरोधी पक्षनेता होऊ शकतो. याच विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी राहुल गांधींनी स्वीकारावी, अशी गळ काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीने त्यांना घातली. परंतु ती जबाबदारी स्वीकाराला सध्या तरी राहुल गांधींनी नकार दिला.