| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २ जून २०२४
यंदाची लोकसभा निवडणूक राजकीय पक्षांसाठी चांगलीच प्रतिष्ठेची ठरली. महाविकास आघाडीने वसंतदादा घराणे व काँग्रेसला डावलल्याने ही निवडणूक विशाल पाटील यांच्या अस्तित्वाची राहिली. बंडाचा झेंडा हाती घेत विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. 'वार फिरलंय'चा नारा देत सहानुभुती मिळवली. त्याचे रुपांतर यशात होईल, अशी गणितं मांडली जात आहेत. याशिवाय जिल्ह्यात महाविकास आघाडीला घरघर लागल्याचे स्पष्ट झाले.
दुसरीकडे खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपचा बालेकिल्ला पुन्हा शाबूत ठेवण्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची केली. त्यांना पक्षांतर्गत संघर्ष करावा लागला. एकंदरीत लोकसभेच्या निकालावर काँग्रेस आणि भाजपच्या आगामी निवडणुकीच्या भवितव्याचा फैसला होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
निवडणूक अत्यंत चुरशीची
सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, 2014 च्या मोदी लाटेमध्ये भाजपने हा बालेकिल्ला हस्तगत करून काँग्रेसला धक्का दिला आहे. त्यानंतर पुन्हा 2019 च्या निवडणुकीत भाजपने या ठिकाणी विजय मिळवला. यावेळी ही निवडणूक अत्यंत चुरशीची बनली आहे.
विश्वासात न घेता चंद्रहार पाटलांना उमेदवारी
महाविकास आघाडीमध्ये असलेल्या शिवसेना (उबाठा) या घटक पक्षाने कोल्हापुरची शिवसेनेची जागा काँग्रेसला दिली आणि त्या बदल्यात सांगलीची जागा घेतली. सांगली लोकसभेची उमेदवारी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना जाहीर करून टाकली. यामध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांना विश्वासात देखील घेतले नाही. त्यामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर निवडणूक रिंगणात 20 उमेदवार असले तरी संपूर्ण निवडणुकीचा प्रचार अधिक तर तीन पाटलांच्या अवती भवती फिरत होता. सुरुवातीला महाआघाडीचे पै. चंद्रहार पाटील यांनी विशाल पाटील व संजय पाटील यांना प्रचारात चांगलीच फाईट दिली. परंतु प्रचार जसजसा पुढे सरकत होता, तसं तसा सारा फोकस विशाल पाटील व संजय पाटील यांच्यावरच राहिला.
विशाल पाटील हे अपक्ष म्हणून निवडणूक मैदानात उतरले असले तरी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपातील नाराज गट विशाल पाटील यांच्या पाठीशी राहिला. रांगड्या भाषेतील मतदारांशी केलेला त्यांचा संवाद हा त्यांना मतदारांजवळ घेऊन गेला. तसेच मतदारांची सहानुभूती हा ही महत्त्वाचा फॅक्टर राहिला. परिणामी सुरुवातीपासूनच विशाल पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली. आणि म्हणूनच सुरुवातीस तिरंगी वाटणारी ही लढत दुरंगी झाली. मतदाना दिवशी तर आघाडीचे पै. चंद्रहार पाटील यांना बूथ एजंट मिळवण्यातही अपयश आले, यावरूनच त्यांची निवडणूकीतील ताकद सर्वांना कळाली.
भाजपाचे संजय पाटील यांनी सुरुवातीस गेल्या दहा वर्षात आपण केलेल्या कामाचा आढावा मतदारांसमोर मांडला. आता मी पाच वर्षात आपण करणार असलेल्या कामाची यादीही सादर केली. परंतु तरीही मतदारांचा कल जसजसा त्यांच्या लक्षात येत गेला तस तसा मुद्द्यावरील ही लढाई गुद्द्यावर आली आणि त्यांनी विशाल पाटील व पक्षांतर्गत विरोधकांवर तोंड सोडले. त्यामुळे त्यांच्या हातून ही निवडणूक निसटली.
विशाल पाटील यांनी मात्र दादा घराणे, काँग्रेसचा बालेकिल्ला, आपल्यावर झालेला अन्याय आणि संजय पाटील यांचे गेल्या दहा वर्षातील विकास कामातील अपयश यावरच सारे लक्ष केंद्रित केले. त्यांच्या पाठीशी असलेला काँग्रेसचा छुपा हात महत्त्वाचा ठरला आणि त्यांनी या निवडणुकीत बाजी मारण्याचे दिसून आले आहे. याचमुळे विशाल पाटील यांचा विजय निश्चित मानला जातो.