| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २२ जून २०२४
अनेकदा आपण वृत्तपत्रातून किंवा टीव्ही चॅनल वरून ऑनलाइन फसवणूक झाल्याचे प्रकार ऐकतो, वाचतो. मोठी रक्कम असेल तर हळहळतोही. पण जर असा फसवणुकीचा प्रकार आपल्या बाबतीत झाला तर ? रक्कम छोटी असो व मोठी. ती आपणास परत मिळू शकते. फक्त एक काम करा, 155260 या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधा. फसवणुकी द्वारा आपली गेलेली रक्कम आपणास परत मिळू शकते. केंद्र शासनाने याबाबत नुकतीच एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे फसवणुकीतून गेलेली रक्कम वाचू शकते.
एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून आपणास कॉल येतो, आपणास ओटीपी मागितला जातो. बोलण्याच्या ओघात आपण तो देतोही. पण लक्षात येते, आपले बँक अकाउंट रिकामे झाले आहे. अशावेळी तात्काळ स्थानिक पोलीस किंवा 155 260 या क्रमांकावर तक्रार दाखल करा. पण लक्षात ठेवा, आपल्या बँकेमध्ये व्यवहारासाठी जो नंबर रजिस्टर केला असेल, त्याच नंबर वरून ही तक्रार दाखल करा.
ज्यावेळी आपण ओटीपी देतो, तेव्हा आपल्या बँकेतून सदरची रक्कम संबंधिताच्या बँकेत जमा होण्यास काही कालावधी लागतो. यादरम्यान जर आपण पोलिसात तक्रार दिली. तर नव्याने निर्माण करण्यात आलेला सायबर विभाग तात्काळ देशभरातील सर्व बँकांना याबाबत माहिती देऊन, हे ट्रांजेक्शन थांबवले जाते. देशभरातील सर्व बँका या विभागाशी जोडल्या गेल्यामुळे यापुढे असे फसवणुकीचे प्रकार रोखण्याचा केंद्र शासनाचा हा उपक्रम आहे.