Sangli Samachar

The Janshakti News

खा. विशाल पाटील यांनी गाजवली पहिलीच नियोजन बैठक, ज्वलंत प्रश्नांनी वेधले लक्ष !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ जून २०२४
सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुरेशभाऊ खाडे यांच्या अध्यक्षते खाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी विविध प्रश्न उपस्थित करुन त्या प्रश्नांकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. खा. विशाल पाटील यांचीही पहिलीच नियोजन बैठक. या बैठकीत त्यांनी मांडलेले मुद्देसूद प्रश्न आगामी संसदीय कामकाजातील दमदार कामगिरीसाठीची झलकच म्हटली पाहिजे.

खा. विशाल पाटील यांनी आपल्या भाषणात उपस्थित केलेले प्रश्न 

१) जिल्ह्यातील शेतक-यांना उध्दवस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करणे 
२) सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ, नरवाड, टाकळी, मालगाव गावांमधील धडक योजनेचे क्षेत्र म्हैसाळ योजनेअंतर्गत समावेश करण्याबाबत काय काय झाले ? कशा पद्धतीने म्हैसाळ योजनेअंतर्गत समावेश होणार आहे का ? मंजुरी मिळाली आहे का, प्रस्तावाची सद्यस्थिती काय आहे ? 

३) लक्ष्मीवाडी, आरग, बेडग या गावांमधील उंचावरील क्षेत्र म्हैसाळ योजनेपासून वंचित आहे. त्याबाबत काय कार्यवाही केली ? सदर उंचावरील क्षेत्र साठी योजना करणेत यावी. 

४) सांगली जिल्हाधिकारी व अन्य शासकीय कार्यालयावर आंदोलन करणा- यांसाठी महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानग्या घेणे ही अट जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रद्द करणे. 


५) सांगली जिल्ह्यामध्ये २०१७ पासून ३००० हून अधिक नवीन परवाने परिवहन विभागाकडून देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील वाढलेल्या रिक्षा आणि प्रवाशांची संख्या पाहता जुने रिक्षा थांबे कमी असून, नव्याने रिक्षा थांबे वाढीसाठी रिक्षा संघटना गेली दोन वर्षे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. तरी जिल्हा प्रशासनाने नव्या रिक्षा थांब्यांना परवानगी द्यावी.

६) महापालिका क्षेत्रात सातत्याने वीज पुरवठा खंडीत होतो. सद्या एका सब स्टेशनवरुन विद्युत पुरवठा शहराला केला जातो. यासाठी सांगली महापालिका क्षेत्रामध्ये नवीन सबस्टेशन उभे करण्यासाठी प्रशासनाने जागा उपलब्ध करुन देणे. 

७) धुळगाव पाणी योजना सक्षमपणे राबविणे 

८) जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयामध्ये विज पुरवठा खंडीत झाल्यानंतर जनरेटर नसल्यामुळे सामान्य नागरीकांची कामे होत नाहीत अनेक वेळा लाईट नाही या सबबी खाली प्रशासन कामकाज करण्यासाठी टाळाटाळ करते. त्यामुळे शासकीय कार्यालयामध्ये जनरेटरची व्यवस्था करावी. 

९) पशुवैद्यकीय दवाखाने साथीचे आजार, लसीकरण उपाययोजना 

१०) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचेकडून कवलापूर विमातळाबाबत महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण यांना जमीन हस्तांतरीत करणेचे काय झाले आणि हस्तांतरण करणेस किती वेळ लागेल. 

११) सद्या विद्यार्थ्यांचे शालेय प्रवेशासाठी जातीचा दाखला काढणे व जात पडताळणी करणे साठी प्रशासनाकडून ते काम वेळेत पूर्ण होवून व त्या अर्जदाराला प्रशासकीय कर्मचा- यांकडून सन्मानाची वागणूक मिळाली पाहीजे.

१२) पुरनियंत्रण समितीच्या कामाची माहिती

१३) परिवहन संवर्गातील रिक्षा, टॅक्सी, व्हॅनसह सर्व परवानाधारक वाहने योग्यता प्रमाणपत्रासाठी योग्यता प्रमाणपत्र संपलेल्या दिनांकापासून प्रतिदिन ५० रुपये लावला गेलेला विलंब शुल्क रद्द करणे. 

१४) सांगली जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी रेल्वे पुलांची, नदीवरील पुलांची कामे प्रलंबित आहेत त्या सर्वांचा आढावा घेवून त्यांना निधी उपलब्ध करुन देणे. अशा मागण्या केल्या.

उपस्थित केलेले प्रश्न आणि ते करीत असताना खा. विशाल पाटील यांची तळमळ आगामी पाच वर्षातील त्यांचे कामाची दिशा दर्शवल्याशिवाय राहत नाही.