| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १२ जून २०२४
राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांत सर्वात जास्त 13 जागा जिंकल्या आहेत. त्यांनी 17 जागा लढवल्या होता. या निवडणुकीत स्ट्राईक रेट 76 टक्के राहिल्याने काँग्रेसचा कॉन्फिडन्स चांगलाच उंचावल्याचे दिसून येत आहे. यातून आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे विधान परिषदेतील प्रतोद ॲड. अभिजित वंजारी यांनी थेट सर्व 288 जागा लढवण्याची भाषा करून काँग्रेस 'एकला चलो रे'च्या भूमिकेत असल्याचे संकेत दिले आहेत.
भाजपचा राज्यात 'मिशन 45' ठरवून विरोधकांचा सुपडासाफ करण्याचा मनसुभा विरोधकांनी उधळून लावला. पक्षफुटीमुळे महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना राज्यभरातून सहानुभूती मिळाली. त्यातच या दोघांसह काँग्रेसच्या नेत्यांनी सत्ताधारी महायुतीविरोधात राज्यभर प्रचाराची राळ उडवून दिली. याचा फायदा विरोधकांना झाला आणि महाविकास आघाडीला 48 पैकी 31 जागा मिळाल्या.
महाविकास आघाडीत ठाकरे गटाला 23 पैकी 9, काँग्रेसला 17 पैकी 13 तर शरद पवार गटास 10 पैकी 8 अशा जागा मिळाल्या. तर महायुतीतील भाजपला 28 पैकी 9, शिंदे गटास 15 पैकी ७ तर अजित पवार गटास 5 पैकी 1 अशा जागा मिळाल्या. सर्वात जास्त जागा मिळालेल्या काँग्रसला महाविकास आघाडीचा फायदा झाल्याचे बोलले जाते. त्यातच आता काँग्रेसच्या नेत्यांनी विधानसभेत सर्वच जागा लढवत एकला चलो रे ची भूमिका घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. यावर वरिष्ठ नेते काय मत व्यक्त करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अभिजीत वंजारी म्हणाले, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस मोठा पक्ष ठरला आहे. असे असतानाही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी विधानसभेच्या 288 मतदारसंघात तयारीचे आदेश दिले आहेत. मग काँग्रेसही तशी तयारी सुरू करेन. आघाडीतील तिन्ही पक्षांनी मैत्रीपूर्ण लढत करावी. त्यामुळे कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही. आता स्वतंत्र लढण्यासाठी बूथ स्तरावरील आढावा घेऊन तो हायकमांडकडे पाठवणार असल्याचेही वंजारींनी सांगितले.
नाना पटोले मुख्यमंत्री व्हावेत
काँग्रेसचे अधिक आमदार निवडून आले तर नाना पटोले मुख्यमंत्री व्हावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यासाठी आमची तयारी आहे. प्री पोल किंवा पोस्ट करायचे हे ठरवावे लागतील, पण विदर्भाचे नाना पटोले मुख्यमंत्री व्हावेत, अशीही इच्छा आमदार वंजारी यांनी यावेळी व्यक्त केली.