आज सारं जग जवळ आलाय म्हणताना मनाजवळ कुणीही आढळत नाही. प्रत्येक जण आपल्या धावपळीत जगताना दिसतो. त्यातूनही मनाला कुठेतरी विश्रांती हवी असते. जी मिळते फक्त त्याच्या जवळच्या नात्यात. आणि अशी जवळची विश्वासाची नाती फार कमी झाली आहेत. पूर्वी एकत्र कुटुंब होतं. घरात भरपूर लोकं होती. मनातील गोष्टी बोलायला घरातच एखादा मित्र किंवा मैत्रीण काका, आत्या, बहीण, भाऊ या नात्यात मिळत होती. आज कुटुंब छोटी झाली आणि नोकऱ्या व्यवसायात व्यस्तता वाढली. मन मोकळं करायला एक हक्काचं ठिकाण आज सापडत नाही.
आज संवाद कमी होत जाताना दिसतोय. सोशल मीडियावर आभासी जगात माणूस आपला आनंद शोधताना जास्त दिसतो. आणि माणसा माणसा तील हळूवार नाती मात्र खूप विरळ होत चाललीय. सहवासाने जिथे मोहरायला व्हायचं तिथे ईमोजीनी भावनाच खूप बोथट करून टाकल्या आहेत. आज डोळ्यात दिसणारे भाव मोबईलच्या GIF मधे सामवलेले दिसतात. स्पर्शातून जी आपुलकी अनुभवायला मिळायची ती दुरापास्त होताना दिसते. नात्याचे हळूवार रेशीम बंध जपताना जोवर आपला 'मी 'बाजूला होऊन 'आपण 'होत नाही तोवर नाती जवळ येत नाही. अश्यावेळी संजीवनी मिळते ती मैत्रीतून.
आजही मैत्रीचे निखळ निर्मळ नाते टिकून आहे. जिथे बिनशर्त तुम्ही गरजेचे असतात. जिथे तुम्हाला व्यक्त व्हायला हक्कचं व्यासपीठ असत, मनातलं आपल्या जिवलग मित्र-मैत्रिणी जवळ बिनधास्त तुम्ही शेअर करू शकतात, हक्काने रागावू शकता, तिथे रुसणं, भांडण अगदी मारामाऱ्या सगळ काही इन आहे. आऊट असतो ते फक्त मीपण. ज्यांना असे निखळ निर्मळ मैत्रीचे आंदण मिळते ते लोक आयुष्यात खूप भाग्यवान असतात.