| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २१ जून २०२४
पावसाळा आला की कृष्णा नदीकाठावरील नागरिकांच्या उरामध्ये धडकी भरते. 2005 व 2019-20 मध्ये आलेल्या महापुरामुळे कृष्णा नदीकाठ परिसरातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. दुर्दैवाने नदीच्या प्रवाहात सापडलो तर, प्रत्यक्ष आपत्ती काळात आपला बचाव कसा करावा, यासाठी कोण कोणते घरगुती साधने उपयोगी पडतील याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक एन डी आर एफ च्या जवानांकडून दाखवण्यात आले.
संभाव्य महापुरात नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफ ची एक टीम 16 जून पासून सांगलीत उपस्थित झाले आहे. जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन आणि एन डी आर एफ असे संयुक्तरीत्या हा उपक्रम हाती घेण्यात आला असून यावेळी विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. एनडीआरएफ चे प्रमुख महेंद्रसिंग पुनिया यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम दिनांक 30 ऑगस्टपर्यंत सांगलीत वास्तव्यास असेल.
जिल्ह्यातील नदीकाठच्या विविध भागात ही टीम वेगवेगळ्या गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांना पूर परिस्थितीत घ्यावयाची काळजी आणि करावयाचा सामना याबाबत माहिती देणार आहे. सांगलीतील कृष्णा नदी मधील प्रात्यक्षिकाच्या वेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, चंद्रकांत खोसे, सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी, सहाय्यक आयुक्त आपत्ती व्यवस्थापन नकुल जकाते आदींसह शासनाच्या विविध अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.