Sangli Samachar

The Janshakti News

महायुतीमधील अस्वस्थता चव्हाट्यावर. अंतर्गत नाराजी वाढली, ऐक्य टिकवून ठेवण्याचे नेत्यांपुढे मोठे आव्हान !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १५ जून २०२४
राज्यातील सत्तारूढ महायुतीची लोकसभा निवडणुकीत पीछेहाट झाली. त्यानंतर सत्ताधारी गोटातून पक्षांतर्गत धुसफूस, जाहीर इशारे आदींचे दर्शन घडू लागले आहे. त्यामुळे महायुतीमधील अस्वस्थता चव्हाट्यावर येऊ लागली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीचे घटक असणाऱ्या भाजप, शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. अजित पवार गटाला तर अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. आता त्या गटात सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

त्या गटाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. त्या जागेसाठी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हेही इच्छूक होते. मात्र, ती संधी हुकल्याने नाराज असल्याचे भुजबळ उघडपणे दाखवत नसले तरी त्यांच्या वक्तव्यांतून बरेच काही सूचित होत आहे. खासदार होण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळेच मी नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार होतो. मात्र, उमेदवार ठरवण्यात खूप विलंब झाला. म्हणून मी थांबलो. सर्वच गोष्टी मनासारख्या घडत नसतात, असे त्यांनी म्हटले.


दुसरीकडे, भुजबळ यांची वक्तव्ये महायुतीच्या दृष्टीने योग्य नाहीत. त्यांना नेमकं काय पाहिजे ते देऊन टाका, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली. त्यांनी राज्य मंत्रिमंडळाचा तातडीने विस्तार करण्याची मागणी केली. तसेच, विलंब झाल्यास गंभीर परिणाम होण्याचा इशाराही दिला. राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरून शिंदे गट आणि भाजपमध्येही वादाची ठिणगी पडल्याचे चित्र आहे. भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांचा जालना लोकसभा मतदारसंघात पराभव झाला. त्याचा ठपका भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सत्तार यांच्यावर ठेवत त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

संबंधित घडामोडी पाहता महायुतीमध्येच राजकीय खडाखडी सुरू झाल्याचे दिसून येत आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक अवघ्या ४ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे महायुतीमधील ऐक्य टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान प्रमुख नेत्यांपुढे उभे राहणार आहे.