Sangli Samachar

The Janshakti News

मा. आयुक्तांनी शहर तुंबण्यापासून वाचण्यासाठी पुण्याप्रमाणे सांगलीतही 'बोअर होल्स' योजना राबवावी !




दरवर्षी पावसाळयात रस्तेच काय शहराचे विविध भाग जलमय होत असल्याने पुणेकरांचे होणारे हाल आणि त्यावरून राजकीय पक्षांकडून होणाऱ्या आंदोलनाला सामोरे जाणाऱ्या पालिका प्रशासनाला आता 'बोअर होल्स 'च्या उपायामुळे दिलासा मिळणार आहे. माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पाच वर्षांपूर्वी सुचविलेल्या या उपायाची अंमलबजावणी आता प्रशासनाने सुरु केली असून त्यानुसार शहरात विविध ठिकाणी सुमारे दहा हजार 'बोअर होल्स' घेण्यास सुरुवातही केल्याने आगामी काळात शहर पावसाच्या पाण्याने तुंबणार नाही असा आशावाद प्रशासकीय पातळीवरून व्यक्त केला जात आहे.

सांगली मिरज कुपवाड शहरालाही ही समस्या फार मोठ्या प्रमाणात जाणवत असते. पावसाळ्यात थोडा जरी मोठा पाऊस पडला की शहरातील सखल भाग जलमय होऊन जातो. रस्त्यावर पाणी असते, गटारी तुंबतात बऱ्याचदा हे पाणी घरामधूनही शिरते. परिणामी नागरिक व प्रशासनाला मोठा सोसावा लागतो. त्यामुळे सांगली महापालिकेचे क्रियाशील आयुक्त मा. शुभम गुप्ता यांनी या 'बोअर होल्स' योजनेची अंमलबजावणी सांगली-मिरजेत केल्यास नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

दरवर्षी कोट्यवधी रुपये नालेसफाईवर खर्च करूनही दरवर्षी पावसाळ्यात शहराचे विविध भाग जलमय आणि वाहतुकीची कोंडी हे चित्र पुणेकरांसाठी चिंताजनक बनले आहे. त्यामुळे यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून पाच वर्षांपूर्वी दिलेल्या पावसाळी चेंबरमध्ये बोअर होल्स घेऊन त्यासाठी स्वतंत्र 'सोक पिट' तयार करण्याच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करा आणि पुणेकरांना दिलासा द्या अशी मागणी माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आबा बागुल यांनी नुकतीच पालिका आयुक्तांची भेट घेऊन केली होती. त्यानुसार आयुक्तांनी तातडीने दखल घेत ,कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यानुसार शहरात ज्या ज्या ठिकाणी पावसाचे पाणी मोठयाप्रमाणावर साचते अशा ठिकाणी पावसाळी चेंबरमध्ये बोअर होल्स घेऊन त्याठिकाणी स्वतंत्र 'सोक पिट' तयार करण्याच्या कामास प्रारंभही झाला आहे.

सांगली शहर हे बशीप्रमाणे आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असते. विशेषतः मारुती रोड, स्टेशन रोड, झुलेलाल चौक, शामराव नगर या भागात ही समस्या नागरिकांना भेडसावत असते. त्यामुळे पुण्याप्रमाणे सांगलीत हे असे बोअर होल्स मारले, तर पाण्याचा योग्य रीतीने निसरा तर होईलच, पण जलस्तर वाढण्यासही मदत होईल. शिवाय दरवर्षी होणारा नारळी सफाई वरील खर्च व आरोग्य विभागावर पडणारा ताण कमी होईल.

सांगलीचे आयुक्त हे केवळ केबिनमध्ये बसून निर्णय न घेता ग्राउंड लेव्हल वर जाऊन समस्या जाणून घेत आहेत. महापालिका क्षेत्रातील नागरिकांमध्ये त्यांच्याबाबतच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. आयुक्ताने ही योजना सांगली व मिरजेत राबवली तर त्यांची 'जनकल्याणक आयुक्त' ही इमेज अधिक व्यापक होईल. म्हणून मा. शुभम गुप्ता यांनी सांगली शहरातील या क्षेत्रातील तज्ज्ञांचे सहकार्य घेऊन हा उपक्रम सांगलीत राबवावा आणि सांगली मिरज शहरातील नागरिकांचा दुवा मिळवावा हीच या निमित्ताने अपेक्षा.